मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते कामाला लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यावरून आता महाविकास आघाडीत धूसफूस सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही भेट फारशी पचनी पडलेली नाही.
बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना या घटक पक्षांकडून व्यक्त होत आहे.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पटोले आणि थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीनंतर फडणवीस यांनी, यासंदर्भात कोअर कमिटी तसेच प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली.
राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार एखाद्या खासदाराच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्ष उमेदवार देत नाही.
मात्र, भाजपने संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळेच यावेळीसुद्धा भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या 'सागर' निवासस्थानी भेट घेतली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे.
या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, तरच उमेदवार मागे घेऊ असे भाजपने सांगितले अशी चर्चा होती.
मात्र, त्यावर फडवीस यांनी खुलासा करत असली राजकीय सौदेबाजी आम्ही करत नाही, असे सांगून ही शक्यता फेटाळून लावली.
हेही वाचा: