नितीन गडकरी उद्या कराडमध्ये; ५ हजार कोटींच्या रस्ते कामांचा शुभारंभ | पुढारी

नितीन गडकरी उद्या कराडमध्ये; ५ हजार कोटींच्या रस्ते कामांचा शुभारंभ

कराड ः पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा ते कागल या दरम्यानच्या मार्गाचे सहापदरीकरण तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 330.80 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 5 हजार 398 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे. त्यानंतर आता या सर्व कामांचा शुभारंभ केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कराडमध्ये शनिवारी होणार आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा ते कागल हे अंतर सुमारे 127.15 किलोमीटर इतके आहे. सद्यस्थितीत हा मार्ग चौपदरीकरण असून आता या मार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. सहापदरीकरणासोबत सेवा रस्ते 7 मीटर ऐवजी 10 मीटरचे होणार आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल तसेच अन्य सुविधा वाहनचालकांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी 4 हजार 479 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मसूर फाटा, इंदोली आणि काशिळ येथील अपघात प्रवण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी साडेतीन किलोमीटर मार्गासाठी 92 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मिरज शहरांतर्गत 10.80 किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी 24 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर आजरा-आंबोली-संकेश्वर विभागाचे उन्नतीकरण होणार असून 62 किलोमीटरसाठी 574 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय 16.45 किलोमीटरमधील कळे ते कोल्हापूर या दरम्यानच्या मार्गाचे उन्नतीकरण होणार असून त्यासाठी 168 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील घाटमाथा ते हेळवाक या दरम्यानच्या 13.10 किलोमीटर अंतरासाठी 17 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय रस्ते बजेटमधून राज्य रस्त्यांची सुधारणा होणार असून त्यासाठी 97.80 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या सर्व कामांचा शुभारंभ नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सांगलीचे पालकमंंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. संजय पाटील, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. मोहनराव कदम, आ. शशिकांत शिंदे, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित असणार आहेत.

दोन मार्गांचे होणार लोकार्पण

सोलापूर जिल्ह्यातील नागज ते मुचंडी या विभागातील सुमारे 49.38 किलोमीटर रस्त्याचे उन्नतीकरण पूर्ण झाले आहे. त्यासाठी 377 कोटींचा निधी मंजूर झाला होता. तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव ते शिरढोण या 22.99 किलोमीटर मार्गाचे 196 कोटींच्या निधीतून काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गांचे लोकापर्णही ना. गडकरी यांच्याकडून होणार आहे.

गडकरींकडून महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

शनिवारी दुपारी 3 वाजता पुणे-बंगळूर महामार्गालगत फर्न हॉटेलमध्ये महामार्ग सहापदरीकरण आणि अन्य रस्त्याच्या कामाचे ई-भूमिपूजन होणार आहे. यावेळी ना. नितीन गडकरी यांच्याकडून काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button