सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवास आता अवघ्या सव्वा तासात! | पुढारी

सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवास आता अवघ्या सव्वा तासात!

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून पुढच्या महिन्यात 9 ऑक्टोबरपासून एअर अलायन्स कंपनीची प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विमानसेवा रोज मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी चालणार आहे. हा सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवास आता केवळ सव्वा तासात होणार आहे.

यासाठी एअर इंडियाचे टू बाय टू सीटचे 70 आसनी विमान प्रवाशांच्या सेवेत असेल. गुरुवारपासून www.airindia.in या एअर इंडियाच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू झाले आहे. 1 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग विमानतळावर तिकिटाचे बुकिंग काऊंटर सुरू होईल, अशी माहिती अलायन्स एअरचे सिंधुदुर्ग स्टेशन मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी दिली. विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवास आता केवळ सव्वा तासात होणार आहे.

मुंबईहून 11.35 वा. विमान सुटेल. सिंधुदुर्गला 1 वाजता पोहोचेल. सिंधुदुर्गहून मुंबईकडे जाताना विमान दुपारी 1.25 वा. सुटेल व मुंबईला दुपारी 2.50 वा. पोहोचणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्गचे प्रवास भाडे 2 हजार 520 रुपये, तर सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवास भाडे 2 हजार 621 असे राहणार आहे.

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेंच्या हस्ते होणार चिपी विमानतळाचे उद्घाटन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या 9 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याहस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी (दि.23) विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी येणार्‍या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे. विमानतळ लवकरच सुरू होणार असल्याने प्रवाशांचा कोकणात पर्यटनाला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

Back to top button