Latest

Raj Thackeray : टोलनाक्यावर पुन्हा एकदा पिवळी रेघ आणि ४ मिनिटांचा नियम सुरु होणार

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टोलप्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.१२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज (दि.१३) सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान गाठले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर टोलनाक्यावंरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी पिवळ्या रेषेचा नियम पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोलनाक्यावरील या पिवळ्या रेषेच्या पुढे गाड्यांची रांग गेली तर पुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून देण्याचा नियम पुन्हा एकदा लागू केला जाणार आहे. तसेच, चार मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबविली जाणार नाही. याशिवाय, वाहनांची नेमकी संख्या तपासण्यासाठी सरकार आणि मनसेचेही कॅमेरे टोलनाक्यांवर लागणार आहेत. (Raj Thackeray)

Raj Thackeray : टोल घेणार असाल तर…

शिवतीर्थवरील बैठकीनंतर राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांनी टोलनाक्यांवरील बदलांसंदर्भातील माहिती दिली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'टोल घेणार असाल तर लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे आता पुढचे १५ दिवस टोलनाक्यांवर सरकारचे तसेच आमचेही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यातून किती गाड्यांची ये जा होते हे पाहिले जाणार आहे. प्रत्येक टोलनाक्यावर असलेल्या पिवळ्या लाईनच्या पलीकडे गाड्या गेल्या तर सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून देण्यात येणार. चार मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबवणार नाही. ही सगळी यंत्रणा पोलिसांमार्फत राबवली जाणार आहे. टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील. टोलनाक्यावरुन किती पैसे वसूल व्हायचे बाकी आहेत याची रोजच्या रोज आकडेवारी डिजिटल बोर्डच्या माध्यमातून टोलनाक्यावर झळकवली जाईल. ज्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता खराब आहे तिथला टोल रद्द करता येतो. त्यामुळे राज्य सरकार याबाबत केंद्रासोबत बोलणार आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT