पुढारी ऑनलाईन : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींची आज सलग तिसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालया ( ईडी ) कडून चौकशी हाेणार आहे. या प्रकरणी कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स देण्यात आले होते.
१३ जूनला राहुल गांधी यांची ईडीकडून सलग साडेतीन तास चौकशी झाली हाेती. त्यानंतर १४ जून रोजी राहुल गांधींची सलग आठ तास चौकशी करण्यात आली. आज सलग तिसऱ्या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांची चाैकशी हाेणार आहे. दिल्लीत 13 जूनला ईडीकडून राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर, त्यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र सिंग हुडा, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी आणि इतर काँग्रेसचे प्रमुख नेते होते. आजही दिल्लीमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.