Latest

राहुल गांधी : ‘भाजपने आपल्या अंतःकरणातील द्वेषावर बुलडोझर चालवावा’

अविनाश सुतार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर भाजपशासित उत्तर दिल्ली महानगरपालिकेने आज (बुधवार) जहांगीरपुरीमधील बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. हा तर संविधानावरील हल्ला आहे. भाजपने आपल्या अंतःकरणातील द्वेषावर बुलडोझर चालवावा, असे गांधी यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या या कारवाईवरून राजकारण तापले आहे. यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हे भारतीय संविधानाच्या मूल्यांचे उल्लंघन आहे. हा गरीब आणि अल्पसंख्याकांवर राज्य पुरस्कृत हल्ला आहे. मनातील द्वेषावर भाजपने बुलडोझर चालवावा. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, काँग्रेसचा इतिहास दंगली आणि भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. राहुल गांधी द्वेषाची बीजे पेरून देशाची प्रतिमा खराब करत आहेत. भ्रष्टाचार आणि दंगलीचा इतिहास असलेल्या व्यक्तीकडून तुम्ही हीच अपेक्षा करू शकता.

याआधीही राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलू देत नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या संकटामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही.  मी यापूर्वीही म्हटले होते कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे ५ लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मोदीजी, कर्तव्य पार पाडा.  प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाखांची भरपाई द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?  

SCROLL FOR NEXT