Latest

Israel Hamas War Updates | युद्धाच्या दोन आठवड्यांनंतर गाझा पट्टीत मदतीचा ओघ सुरु

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर आज प्रथमच मदत वाहून नेणारे ट्रक गाझामध्ये दाखल झाले. पांढरे निशाण लावलेली संयुक्त राष्ट्रांची वाहने इजिप्तमधून रफाह सीमा ओलांडून गाझामध्ये आली आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, औषधे, अन्नसाठा आदी मदत ट्रकमधून गाझामधील नागरिकांना पोहोचवण्यासाठी नेली जात आहे. युद्ध सुरु झाल्यानंतरच्या दोन आठवड्यांनी गाझामध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पोहोचवली जात आहे. (Israel Hamas War Updates)

संबंधित बातम्या 

इस्त्रायल-हमास युद्धात मोठी जीवितहानी झाली आहे. हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझा आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की आतापर्यंत ४,१३७ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि १३ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.

७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात इस्रायलमधील १,४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. याशिवाय या हल्ल्यादरम्यान हमास दहशतवाद्यांनी २०३ लोकांना पकडून गाझामध्ये नेले होते, असे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे.

युद्ध संघर्षामुळे गाझामधील लाखो लोक अन्न, पाणी टंचाईने त्रस्त आहेत. रुग्णालयात औषधांचा पुरवठा थांबला आहे. यामुळे बॉम्बस्फोटात मोठ्या संख्येने जखमी झालेल्या लोकांवर उपचार करणे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कठीण बनले होते.

या पार्श्वभूमीवर सुमारे ३ हजार टन मदत वाहून नेणारे २०० हून अधिक ट्रक गाझाकडे जाण्यासाठी गेली अनेक दिवस रफाह क्रॉसिंगजवळ उभे होते. ते आता सीमा खुली झाल्याने गाझाच्या दिशेने रवाना झाल्याचे असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

गाझामध्ये भीषण मानवतावादी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्राने गाझामध्ये अधिक मदत पाठविण्याचे आवाहन केले आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक सिंडी मॅककेन यांनी कैरो येथे असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले की, "लोकांना आता मानवतावादी मदत मिळाली नाही तर ते उपाशी राहतील."

शनिवारी पहाटे युद्धात उद्ध्वस्त झालेल्या भागात २० ट्रकच्या ताफ्याला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती ती पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. "तेथील लोकांच्या मदतीसाठी आणखी ट्रकमधून मदत पाठविण्याची गरज आहे. इजिप्तच्या सिनाईमध्ये १ हजार मेट्रिक टन मदत गाझाला पाठवण्यास तयार आहे." असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT