Latest

पुणे : कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घेऊन अतिरिक्त उसाचे गाळप करा : अजित पवार

backup backup

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच ताब्यात घेतलेले हार्व्हेस्टर गळीत हंगाम सुरु असणार्‍या साखर कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन दयावेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी (दि.7) बैठक झाली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ऊस तोडणी यंत्रे ताब्यात घेण्यासाठी साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना तातडीने सूचना द्याव्यात. शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे पवार म्हणाले आहेत.राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे ऊसतोड मजूरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. पुढील वर्षी सुध्दा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुढील गळीत हंगामाचेसुध्दा योग्य ते नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

अजूनही 130 लाख मे.टन ऊस गाळप बाकी ः साखर आयुक्त

बैठकीनंतर 'पुढारी'शी बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, राज्यात आजअखेर सुमारे 1171 लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. मराठवाड्यात सुमारे 60 लाख आणि इतरत्र मिळून 70 लाख असे एकूण 130 लाख मे.टन उसाचे गाळप बाकी आहे. गतवर्षी याचदिवशी सुमारे 981 लाख मे.टन उसाचे गाळप कारखान्यांनी पूर्ण केले होते. याचा अर्थ गतवर्षीपेक्षा आजअखेर कारखान्यांनी 190 लाख मे.टनांनी राज्यांत अधिक ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तसेच एकट्या मराठवाड्यात गतवर्षीपेक्षा सुमारे 90 हजार हेक्टरने ऊस लागवड वाढलेली आहे. हंगामअखेर राज्यात सुमारे तेराशे लाख मे.टन ऊस गाळप आणि सुमारे 130 लाख मे.टनाइतके उच्चांकी साखर उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे. वाढत्या उन्हामुळे यापुढे उसाच्या वजनात आणि साखर उतार्‍यात घट येण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT