नाशिक : युनियन बँक चोरट्यांनी फोडली; पैसे न मिळाल्‍याने डीव्हीआर घेऊन केले पलायन | पुढारी

नाशिक : युनियन बँक चोरट्यांनी फोडली; पैसे न मिळाल्‍याने डीव्हीआर घेऊन केले पलायन

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरासह साक्री तालुक्यात चोरट्यांनी कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत. असे असताना साक्री तालुक्यातील कुडाशी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल (बुधवार) रात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नसल्याने त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडत सीसीटीव्हीचा हार्ड डिस्कसह डीव्हिआरच लांबविला. यातून आपला काहीच सुगावा लागू नये यासाठी चोरट्यांनी केलेली हुशारीची आज चर्चा सुरू होती.

युनियन बँक ऑफ इंडियाची कुडाशी येथे शाखा असून, बुधवारी रात्री चोरट्यांनी तेथे चोरीचा प्रयत्न केला. बँकेसह परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी फोडले. त्यानंतर बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून ते आत शिरले. तेथील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. तसेच तेथील संगणकही फोडले. बँकेतील लॉकर फोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

बँकेशेजारीच एटीएम असून, तेथेही चोरट्यांना काही मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पिंपळनेर येथील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, चोरट्यांनी सीसीटीव्ही, संगणक फोडल्याचे व बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व हार्डडिस्क काढून नेल्याचे निदर्शनास आले. आज उशिरा पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. पोलिसांकडून बँकेसह परिसरात तपासणी सुरू होती.

कुडाशी येथील युनियन बँकेत सिक्युरिटी नाही, बँकेच्या दर्शनी भागाला फक्त दुकानाला असतो तसा लोखंडी सेंटरचा दरवाजा असून, त्या दरवाज्याला सेंटर लाँक नाही. दोन्ही बाजूच्या शटरच्या कुलुपाच्या कड्या तोडून चोरांनी आत प्रवेश केला.

Back to top button