Latest

कोळसा वापरण्यास ‘या’ शहरात पुढील वर्षांपासून प्रतिबंध, ‘सीएक्यूएम’चे आदेश

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानीत पुढील वर्षांपासून कोळसाचा वापर करण्यास कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (सीएक्यूएम) प्रतिबंध घातला आहे. औद्योगिक, घरगुती तसेच सर्व प्रकारच्या कामांसाठी कोळशाचा वापर करता येणार नाही, असे 'सीएक्यूएम' ने आपल्या नविन आदेशात सांगितले आहे.

कोळशाच्या सरसकट वापरावर प्रतिबंध घालण्यात आला असला तरी कमी सल्फर असलेल्या कोळशाच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील वापराला मात्र परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी पीएनजी वायू पुरवठ्याची पायाभूत सुविधा आहे, अशा ठिकाणी कोळसा वापराचा प्रतिबंध १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे तर ज्या ठिकाणी ही पायाभूत सुविधा नाही, अशा ठिकाणी हा आदेश १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरात दिल्लीचा समावेश होतो. या पार्श्वभूमीवर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कोळसा वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दिल्ली आणि त्याला लागून असलेल्या गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद आदी शहरातील दैनिक सरासरी एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) ३०० ते ४०० च्या आसपास असतो. दिल्लीतील प्रदूषणामागे मोठ्या प्रमाणात कोळशाचे ज्वलन कारणीभूत असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगितले आहे. त्‍यामूळे पुढील वर्षांपासून दिल्‍लीत कोळसा वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT