Latest

Team India : न्यूझीलंडविरुद्ध पंत-गिल देतील सलामी, ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाच्या (team india) हातून पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी निसटली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या जागतिक स्पर्धेत टीम इंडियाला सेमीफायनलचा अडथळा पार करता आला नाही. या पराभवानंतर सुमारे आठवडाभराने भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर टी-20 मालिकेत न्यूझीलंडचे आव्हान आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे 18 नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) होणार असून, टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (probable playing xi of team india against new zealand in 1st t20 ind vs nz)

न्यूझीलंड विरुद्धच्या (Ind vs NZ) टी 20 मालिकेसाठी संघाची घोषणा वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना करण्यात आली होती. या संघातून रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह काही वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात आले होते. त्यांना विश्रांती देत असल्याचे कारण बीसीसीआयच्या (BCCI) निवड समिती स्पष्ट करत संघात नवीन चेह-यांना संधी देण्यात आली. तर या नव्या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (hardik pandya) सोपवण्यात आले. काही विश्लेशकांनी ही भविष्यातील तयारी असल्याचे मत मांडले होते.

ऋषभ पंतवर (rishabh pant) मोठी बाजी?

वेलिंग्टन येथे स्काय मैदानावर शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे. यात नव्या संघाची कसोटी असणार आहे. पण दुसरीकडे नव्या खेळाडूंना ही मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. यामध्ये सर्वात मोठे नाव ऋषभ पंतचे आहे. वर्ल्ड कपच्या दोन सामन्यात पंतला संधी मिळाली पण दोन्ही सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. पण नव्या संघात त्याच्याकडे सलामीची जबाबदारी देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तो डावाच्या सुरुवातीपासूनच गोलंदाजांची धुलाई करतो की नाही हे स्पष्ट होईल. (probable playing xi of team india against new zealand in 1st t20 ind vs nz)

50 हून अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही पंतला (rishabh pant) या फॉरमॅटमध्ये कसोटी किंवा वनडेसारखे यश मिळवता आलेले नाही. अशा स्थितीत सलामीला येऊन धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करणे हा त्याच्यासाठी मुक्तपणे खेळण्याचा मार्ग मानला जात आहे.

पंत सलामीला आला तर त्याच्या सोबतीला दुसरा फलंदाज कोण असेल असा एक प्रश्न उपस्थित आहे. न्यूझीलंड दौ-यासाठी इशान किशन (Ishan Kishan) हा देखील या संघात आहे आणि गेल्या दीड वर्षात त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले आहेत. पण गेल्या काही महिन्यांत तो छाप पाडू शकलेला नाही. अशा परिस्थितीत दोन डावखुऱ्या फलंदाजांना सलामीला मैदानात उतरवणे फायदेशीर ठरणार नाही, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशात शुबमन गिलची (shubman gill) दखल घेणे आवश्यक असेल. त्याला पहिल्यांदाच टी-20 संघात संधी मिळाली आहे. गिलने आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि तो आक्रमकतेने डावाची सुरुवातही करण्यास सक्षम असल्याचे अनेकांचे मत आहे. (probable playing xi of team india against new zealand in 1st t20 ind vs nz)

अय्यर, हुड्डा की आणखी कोणी?

मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कर्णधार हार्दिकला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि दीपक हुड्डा (deepak hooda) यांच्यापैकी एकाला संधी द्यावी लागेल. या मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून गेलेले व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले होते की अशा खेळाडूंना संधी दिली पाहिजे जे गोलंदाजीही करू शकतात. दीपक हुड्डा या कॅटेगरीत बसतो. मात्र, अय्यरही गोलंदाजी करू शकतो. पण इथे हुड्डा अय्यर पेक्षा वरचढ ठरतो. फॉर्मचा विचार केला तर अय्यर सरस आहे आणि हेच एक कारण आहे ज्याच्या जोरावर अय्यरच्या नावाची चर्चा होऊ शकते. दिनेश कार्तिकच्या फिनिशरच्या भूमिकेसाठी संजू सॅमसनची (sanju samson) निवड जवळपास निश्चित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तीन वेगवान गोलंदाजांना स्थान मिळेल…

वेलिंग्टनची परिस्थिती लक्षात घेता प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाज मैदानात उतरणे निश्चित आहे. संघात बदल हवा असेल तर उमरान मलिकला संधी द्यावी लागेल. त्यांच्यासोबत भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग आपल्या स्विंगने प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखण्याचे काम करतील. मात्र, भुवीवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. तो नसेल तर हर्षल पटेल किंवा मोहम्मद सिराजला संधी मिळेल. फिरकी विभागात युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश असेल.

टीम इंडियाची संभावित प्लेईंग 11 अशी असेल…

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, श्रेयस अय्यर/दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT