Latest

महाजन, मुंडे यांच्याप्रमाणेच मेटे यांचे निधनही बीडकरांना चटका लावणारे!

स्वालिया न. शिकलगार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि आता विनायकराव मेटे बीड जिल्ह्याच्या या तिन्ही भूमिपुत्रांचे आकस्मिक आणि अपघाती निधन व्हावे ही बीड जिल्ह्यासाठी धक्कादायक बाबच म्हणावी लागेल. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अंबाजोगाई येथे वास्तव्यास असलेले प्रमोद महाजन यांचा राजकीय प्रवास सर्वांना चकित करणारा आहे. अंबाजोगाई येथे महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाजन यांनी पुण्यात पत्रकारिता केली. परंतु वर्षभरानंतर ते अंबाजोगाईत परत आले व शिक्षकाची नोकरी पत्करली. रा. स्व.संघ आणि अभाविपच्या मुशीतून घडलेल्या महाजन यांच्याकडे जनसंघाचे तत्कालीन संघटन मंत्री वसंतराव भागवत यांचे लक्ष गेले व त्यांनी संघटनात्मक कामासाठी महाजन यांना मुंबईला बोलावले वक्तृत्वाची जन्मजात देणगी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आणि संघटनात्मक गुण कौशल्यामुळे महाजन यांनी अल्पावधीतच भाजपमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले.

पक्ष संघटन आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला परंतु २२ एप्रिल, २००६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या. दुर्दैवाने १३ दिवसानंतर महाजन यांचे ३ मे रोजी निधन झाले. महाजन यांच्या धक्यातून बीड जिल्हा सावरत नाही तोच ३जून, २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांचा मृत्यूही बीड जिल्ह्याला सहन करावा लागला. त्या दिवशी मुंडे हे औरंगाबाद, बीडकडे निघाले असताना दिल्ली येथे त्यांच्या वाहनाला सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

महाजन आणि मुंडे यांनी भाजपाच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचे नेते यावेत, यासाठी या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच भाजपाचा आता चेहरा बदलू लागला आहे. बीड जिल्ह्यातील केजचे रहिवासी असलेले विनायक मेटे यांचाही रविवारी सकाळी झालेला मृत्यू असाच धक्का देणारा ठरला आहे.

प्रारंभी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये सक्रिय झालेल्या मेटे यांनी मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली. मुंबई येथे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या नियोजित शिवस्मारकाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. मागील अडीच वर्षात सत्ता बदलामुळे या जबाबदारीतून ते काही काळ दूर होते. परंतु नवीन सरकार आल्यानंतर ते पुन्हा सक्रीय झाले. पण नियतीला हे मान्य नसावे. बीड जिल्ह्यातून पुढे आलेला हा तिसरा नेताही काळाने आकस्मिक हिरावून घेतला.

SCROLL FOR NEXT