इतिहास : वाटचाल तिरंग्याची… | पुढारी

इतिहास : वाटचाल तिरंग्याची...

केशरी रंग भारतीयांना देशासाठी त्याग, धैर्य आणि नि:स्वार्थीपणाचा संदेश देतो. मध्यवर्ती पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता याचे स्मरण देतो; तर हिरवा रंग समृद्धी, सुख व प्रगती दर्शवतो. अशोक चक्र विश्वकल्याणकारी धर्माचे चक्र गतिमान करण्याचा बुद्धाने जो संदेश दिला, त्याचे प्रतीक आहे.

देशाचा राष्ट्रध्वज म्हणजे त्या देशाची उच्चतम मूल्ये, एकसंधत्वाची भावना, त्याच्या आशा-आकांक्षा यांचे प्रतीक असते. एका अर्थाने, देशाचा राष्ट्रध्वज म्हणजे त्याच्या राष्ट्रधर्माचा वा राष्ट्रचरित्राचा सार असतो. त्यामुळे त्याच्या निर्मितीत व निश्चितीत एक प्रदीर्घ चिंतनप्रक्रिया दडलेली असते. आपल्या तिरंग्याच्या निर्मितीचा व निश्चितीचा चिंतनप्रवास सुमारे 41 वर्षांचा सांगता येतो. 1906 ते 1947 या कालखंडात भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना, निर्मिती व निश्चिती याविषयी चिंतन व प्रयत्न सुरू होते. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या प्रत्येक राजसत्तेचा ध्वज वेगवेगळा होता.

काही इतिहासकारांच्या मते क्रांतिकारकांपैकी काहींनी मध्यभागी कमळ असलेला एक हिरव्या रंगाचा ध्वज बनवला होता. त्यानंतर 1906 साली भारताचा ध्वज तिरंगा झाला. कोलकात्याच्या पारसी बागान चौकात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. मध्यभागी ‘वंदे मातरम्’ लिहिलेला व आठ कमळे असलेला हा तिरंगा हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांचा होता. 1907 साली जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मादाम भिकाजी कामा यांनी स्वतः बनवलेला एक तिरंगा सादर केला. पारसी बागान चौकात फडकवण्यात आलेल्या आणि जर्मनीमध्ये फडकवण्यात आलेल्या तिरंग्यात काही किरकोळ बदल होते.

मादाम कामा यांच्या तिरंग्यात सर्वात वरच्या पट्टीत कमळाऐवजी तत्कालीन भारतात असलेल्या आठ प्रांतांचे प्रतीक असलेले आठ तारे आणि सर्वात खालच्या पट्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक सूर्य व चंद्र अंकित करण्यात आले होते. 1936 ला मादाम कामांनी तिरंग्याचे आणखी एक स्वरूप बनवले होते. 1917 साली भारतीय स्वातंत्र्य संग्राम एका विशेष वळणावर येऊन पोहोचला होता. डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात ‘होम रूल’ आंदोलन जोम धरू लागले होते. त्यावेळी तिसरा तिरंगा अवतरला. पाच लाल व चार हिरव्या पट्ट्यांसह युनियन जॅक असलेला हा तिरंगा होम रूलच्या उद्देशाला प्रकाशमान करत होता. अजून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले नसले, तरी होम रूल म्हणजे स्वयंशासनाचा आम्हाला अधिकार आहे, हे सांगण्याचा येथे प्रयत्न करण्यात आलेला दिसतो.

प्राचीन परंपरा दर्शवणारे सात तारे म्हणजे सप्तर्षी व एकतेचे प्रतीक सूर्य-चंद्र या ध्वजात होते. हा राष्ट्रध्वज हातात घेतलेले टिळकांचे एक दुर्मीळ छायाचित्रदेखील उपलब्ध आहे. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कमान महात्मा गांधींकडे आली होती. तत्पूर्वीच ‘यंग इंडिया’ पत्रिकेतील आपल्या एका लेखात गांधीजींनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्याचबरोबर त्यांनी पिंगली व्यंकय्या यांना राष्ट्रध्वज तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. 1921 च्या विजयवाड्याच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात हा राष्ट्रध्वज फडकवला जाणार होता; परंतु पिंगली व्यंकय्या हे काम वेळेत करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी लाल व हिरव्या रंगाचा राष्ट्रध्वज तयार केला. तो तिरंगा नव्हता.

व्यंकय्या यांच्या विलंबामुळे गांधीजींनादेखील राष्ट्रध्वजावर विचार करता आला. त्यांनी या ध्वजात काही बदल सुचवले. रंगांच्या समावेशावरून हिंदू व मुस्लिम यांना ध्वजात स्थान होते; परंतु इतर धर्मियांना स्थान नव्हते.त्यांच्यासाठी म्हणून गांधीजींनी त्यात पांढरी पट्टी वाढवण्यास सांगितली आणि आपला ध्वज पुन्हा तिरंगा झाला. त्याचबरोबर राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून लाला हंसराज यांनी सुचवल्याप्रमाणे फिरणार्‍या चरख्याचा समावेश करण्यात आला. तसेच स्वदेशी वस्त्रातच हा ध्वज बनवण्याचा दंडक घालून देण्यात आला. 1921 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्यांमध्ये सहभागी आंदोलकांनी सर्वप्रथम चरखाधारी तिरंगा हातात घेतला. 1929 साली लाहोर काँग्रेसमध्ये आपल्या भाषणात गांधीजींनी रंग आणि धर्म यांचा संबंध विच्छेद करत केसरी रंग बलिदान, पांढरा रंग पवित्रता आणि हिरवा रंग म्हणजे आशेचे-समृद्धीचे प्रतीक आहे, असे स्पष्ट केले. तसेच 1931 साली काँग्रेस पक्षाने या ध्वजाला आपला ध्वज म्हणून मान्यता दिली.

फिरणार्‍या चरख्यातील चक्राची जागा पुढे सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील ‘धम्मचक्क’ घेणार होते. दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीत एक तिरंगा फडकवला होता. ज्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्ये पांढरी आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी होती. तसेच मधल्या पांढर्‍या पट्टीवर एक वाघ होता. आजच्या तिरंग्यात त्याच्या जागी अशोकचक्र आले, एवढाच काय तो फरक सांगता येतो. भारतीय स्वातंत्र्याचे तांबडे फुटू लागले आणि राष्ट्रध्वजाविषयी अधिक गांभीर्याने विचार होऊ लागला. 1940 साली ब्रिटिश सरकारने राष्ट्रध्वजावर विचार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, चकवर्ती राजगोपालाचारी, के. एम. पणिकर, फ्रँक अँथनी, उज्जल सिंह व एस. एन. गुप्ता यांची समिती बनवली.

या समितीची पहिली बैठक 10 जुलै 1947 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पं. जवाहरलाल नेहरू यांना या बैठकीस विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रध्वजाच्या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करून त्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले. 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेत अशोक चक्रासह तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि संविधान सभेने त्याला मान्यता दिली.तोवर भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी व्यक्त करण्यात आलेल्या आशा-आकांक्षा जणू काही तिरंग्यात सामावल्या गेलेल्या दिसतात. तिरंग्याच्या वरच्या भागातील केशरी रंग भारतीयांना देशासाठी त्याग, धैर्य आणि नि:स्वार्थीपणाचा संदेश देतो; तसेच राजकीय नेतृत्वाला वैयक्तिक लाभाचा त्याग करून देशासाठी समर्पण भावाने कार्य करण्याची आठवणदेखील देतो.

मध्यवर्ती पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता व प्रामणिकपणा याचे स्मरण देतो; तर हिरवा रंग समृद्धी, सुख व प्रगती दर्शवतो. तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र जगाला भगवान बुद्धांनी स्वतःच्या परिवर्तनातून जगात परिवर्तन करण्याचा आणि विश्वकल्याणकारी धर्माचे चक्र गतिमान करण्याचा जो संदेश दिला, त्याचे प्रतीक आहे. सम्राट अशोकाने सारनाथ येथील स्तभांवर हे चोवीस आर्‍या असलेले चक्र बुद्धांचे तत्त्वज्ञान साररूपात व्यक्त करण्यासाठी कोरले होते. तसेच दिवसाचे चोवीस तास आम्ही या तत्त्वज्ञानावर चालत देशाला आणि जगाला शांतता व समृद्धी यांच्याकडे घेऊन जाऊ, हेदेखील यामधून व्यक्त होते. तिरंग्यात हे चक्र निळ्या रंगात दर्शवलेले आहे. निळा रंग असीम आकाशाचा व महासागरांचा रंग आहे.

आमच्या प्रगतीत आम्ही असीम आकाशाप्रमाणे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून अखिल विश्वाला व्यापणार आहोत, हेच हा निळा रंग सांगतो. सारांश रूपात सांगायचे झाल्यास भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक, भाषिक इत्यादी मानवनिर्मित भेदांना त्यागत सर्वोच्च मानवी मूल्यांच्या आधारे खर्‍या विश्वधर्माची ग्वाही तिरंगा देतो. तिरंग्याला ‘चक्रध्वज’ असे घटनात्मक नाव आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्यासाठी ते वेळोवळी पुरावेदेखील देत असतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईच्या सुरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘राष्ट्रध्वज’ म्हणून सर्वप्रथम तिरंगा फडकवला!

Back to top button