मंत्रिपदामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली : दीपक केसरकर

मंत्रिपदामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली : दीपक केसरकर

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. माझ्याकडून लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. जनतेच्या आशीर्वादाने मी माझी जबाबदारी समर्थपणे पेलेन व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे माझे विशेष लक्ष राहील. सर्वांच्या सहकार्याने मी माझे काम करत राहीन, असे मत कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर दीपक केसरकर शनिवारी प्रथमच सावंतवाडी मतदारसंघात दाखल झाले. सकाळी त्यांचे केंद्रे पुनर्वसन वीजघर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. नितीन बगाटे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, तिलारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपकार्यकारी अभियंता अनिल बडे यांसह गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस, बाबाजी देसाई, प्रवीण गवस, मायकल लोबो, विलास सावंत व त्यांचे समर्थक, ग्रामस्थ उपस्थित होते.

आयनोडे-हेवाळे सरपंच साक्षी देसाई व ग्रामस्थांच्या विनंतीवरून मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रे मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. केंद्रे येथील सत्कारानंतर त्यांनी तेरवण-मेढे येथील श्री स्वयंभू नागनाथाचे दर्शन घेतले. तेथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. पुढे साटेली-भेडशी येथील वरचा बाजार, खालचा बाजार येथे ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. झरेबांबर येथे सत्कार झाल्यानंतर केसरकर यांचे दोडामार्ग शहरात आगमन झाले. येथील पिंपळेश्वर मंदिरात ते नतमस्तक झाले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर,शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, उपसभापती क्रांती जाधव, नगरसेवक, नगरसेविका यांनी ना. केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केसरकर समर्थक व ग्रामस्थांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर ना. केसरकर यांनी सावंतवाडीच्या दिशेने प्रयाण केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news