पुणे : तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग | पुढारी

पुणे : तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या वेळी शहरातील हॉटेल, लॉज, ढाबे, बस स्थानके, रेल्वे स्टेशन परिसराची तपासणी करण्यात आली. तब्बल 3 हजार 381 गुन्हेगारांना पोलिसांनी तपासले, त्यापैकी 547 गुन्हेगार मिळून आले. बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍यांना अटक करून, त्यांच्याकडून 2 पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याकडील पथकांनी आर्म अ‍ॅक्टनुसार 34 गुन्हे दाखल करून 35 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 29 कोयते, 2 तलवारी, पालघन, खंजीर, मोबाईल, दुचाकी असा 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आकाश प्रकाश जाधव (वय 24, रा. भिलारेवाडी, कात्रज) याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल व काडतूस असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच खंडणीविरोधी पथकाने आकाश अरुण पवार (रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक करून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व काडतूस जप्त केले आहे. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नात फरारी असलेले दोघे आरोपी जय विटकर व अनिल विटकर (रा. लाल चाळ झोपडपट्टी, गोखलेनगर) या दोघांना अटक केली आहे.

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रोहित नितीन पांचागडे (रा. गोसावीवस्ती, हडपसर) याला अटक करून त्याच्या ताब्यातून मोबाईल व दुचाकी असा 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने आदित्य आत्माराम म्हस्के (वय 19, रा. हडपसर) याला अटक करून त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन दोघांकडून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीची चोरीची पाच दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाणे व अमली पदार्थ विरोधी पथकाने प्रत्येकी एका आरोपीला अटक केली आहे. गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करून पोलिसांनी 18 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 11 आरोपींना अटक करून 167 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे; तसेच जुगार खेळणार्‍या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

102 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, तडीपार कालावधीत मिळून आलेल्या 13 गुन्हेगारांवर 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभारी अधिकार्‍यांनी केली.

Back to top button