Latest

राज्यसभेवर जाणारे सारेच कोट्यधीश; प्रफुल्ल पटेल सर्वाधिक श्रीमंत

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा :  राज्यसभेसाठी गुरूवारी उमेदवारी दाखल केलेल्या राजकीय पक्षांच्या सहा उमेदवारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार प्रफुल्ल पटेल आहेत. त्यांच्याखालोखाल मिलिंद देवरा यांचा क्रमांक लागतो. चंद्रकांत हंडोरे सर्वात कमी संपत्तीचे मालक आहेत.
प्रफुल्ल पटेल यांची स्थावर व जंगम मालमत्तेचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य हे 436 कोटी आहे. मिलिंद देवरा यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य हे 137 कोटी आहे. चव्हाणांच्या खालोखाल डॉ. अजित गोपछडे यांची संपत्ती आहे.

संबंधित बातम्या 

डॉ. गोपछडे यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य हे 66.79 कोटी आहे. डॉ.गोपछडे यांनी विकत घेतलेल्या एका भूखंडाचे मूल्य हे विकत घेताना 54.35 लाख होते. या भूखंडाची किंमत 61 कोटींच्या घरात पोचली आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची संपत्ती 5 कोटींची आहे. तर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य 2.54 कोटी आहे.
चव्हाण, पटेलांच्या

संपत्तीत 18 कोटींनी वाढ

अशोक चव्हाण यांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य 68.34 कोटी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्राशी तुलना केल्यास चव्हाणांच्या एकूण संपत्तीत 18 कोटींनी वाढ झाली आहे. तर प्रफुल्ल पटेलांच्या संपत्तीत मात्र हीच 18 कोटींची वाढ अवघ्या दोन वर्षात झाली आहे. जून 2022 मध्ये पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी भरलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 418 कोटी होती. ती फेब्रुवारी 2024 मध्ये 436 कोटींंवर पोहोचली.

अशोक चव्हाणांनी दिली 'आदर्श' गुन्ह्याची माहिती

अशोक चव्हाणांनी आपल्या शपथपत्रात त्यांच्यावर दाखल विविध गुन्ह्यांची माहिती दिली आहे. यात सीबीआय आणि लाचलुतपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या तसेच विजय दर्डा यांच्याशी संबंधित जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिका-यांना दिलेल्या निर्देशांबद्दलच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ईडीने मनी लाँडर्रिंग प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांचाही यात उल्लेख आहे.

दृष्टिक्षेपात उमेदवारांची संपत्ती
प्रफुल्ल पटेल
जंगम ः 149 कोटी
स्थावर ः287.70 कोटी
दायित्वे ः निरंक
(दागिन्यांची किंमत 8 कोटी)
मिलिंद देवरा
जंगम ः 113.99 कोटी
स्थावर ः 23.99 कोटी
दायित्वे ः निरंक

अशोक चव्हाण
जंगम मालमत्ता ः रू.16.69 कोटी
स्थावर मालमत्ता ः रू. 51.65 कोटी
दायित्वे ः 5 कोटी

डॉ. अजित गोपछडे
जंगम ः 3 कोटी
स्थावर ः 63.79 कोटी
दायित्वे ः 4.16 कोटी

मेधा कुलकर्णी
जंगम ः 2.43 कोटी
स्थावर ः 2.48 कोटी
दायित्वे ः 54.26 लाख

चंद्रकांत हंडोरे
स्थावर मालमत्ता ः 1.68 कोटी
जंगम मालमत्ता ः 86.73 लाख
दायित्वे ः 54.04 लाख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT