नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Age for lok sabha and assembly Election : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीची वयोमर्यादा कमी केली जावी, असा सल्ला संसदीय समितीने केंद्र सरकारला दिला आहे. ही वयोमर्यादा कमी करण्यात आली तर लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मोठ्या प्रमाणात युवकांना मिळेल, असा युक्तिवाद संसदेच्या कायदा आणि कार्मिक विषयक समितीने आपल्या अहवालात केला आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीची सध्याची किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे तर राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठीची वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. दुसरीकडे निवडणुकीत मतदान करण्यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षे इतकी आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षापर्यंत खाली आणावी, असे स्पष्ट मत समितीने मांडले आहे.
कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांत निवडणुका लढविण्यासाठीची वयोमर्यादा भारताच्या तुलनेत कमी आहे. युवकांना लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या देशांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे ही वयोमर्यादा कमी केली जाऊ शकते, असेही सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने म्हटले आहे.