Modi surname remark | राहुल गांधी आता लढवू शकतात २०२४ ची निवडणूक | पुढारी

Modi surname remark | राहुल गांधी आता लढवू शकतात २०२४ ची निवडणूक

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या अवमानकारक टिप्पणी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांची शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली. या शिक्षेवर स्थगिती देताना, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ट्रायल कोर्टाने मानहानी प्रकरणात भारतीय दंड संहितेनुसार राहुल गांधींना दोन वर्षांची कमाल शिक्षा ठोठावण्याचे कारण दिले नाही. (Modi surname remark)

“सार्वजनिक जीवनातील एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक भाषण करताना सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे,” असेही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्ती बीआर गवई, पीएस नरसिम्हा आणि संजय कुमार यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, गुजरात उच्च न्यायालयानेही राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळताना त्यांना जास्तीत जास्त शिक्षा का देण्यात आली या पैलूचा विचार न करण्यात चूक केली. (Rahul Gandhi Defamation Case)

दरम्यान, राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना लोकसभेची खासदारकी पुन्हा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत. तसेच राहुल गांधी आता २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकतात. (Modi surname case)

राहुल गांधी यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती व गुजरात उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यावर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

राहुल गांधी हे अट्टल गुन्हेगार नाहीत तसेच त्यांच्यावर हत्या, बलात्काराचे आरोप नाहीत, असा युक्तिवाद राहुल गांधी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांचे मूळ आडनाव मोदी नाही. नंतर त्यांनी आपले आडनाव मोदी केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ज्या लोकांची नावे घेतली होती, त्यातील एकाही व्यक्तीने त्यांच्याविरोधात अवमाननेचा खटला दाखल केला नव्हता. मोदी आडनावाचा समाजघटक छोट्या प्रमाणात असून त्यांच्यात कोणतीही एकरुपता अथवा समानता नाही. ज्या लोकांनी गांधी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे, ते लोक भाजपचे असल्याचेही सिंघवी यांनी युक्तिवादात सांगितले.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी एका पूर्ण वर्गाला बदनाम केलेले आहे, त्यामुळे त्यांना देण्यात आलेली शिक्षा योग्य असल्याची भूमिका पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांनी मांडली. गांधी यांचे भाषण ५० मिनिटांपेक्षा जास्त काळ चालले होते. त्यांनी केलेल्या विधानांचे पुरावे व क्लिपिंग निवडणूक आयोगाकडे आहेत. याआधी राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांना दोषी ठरविलेले आहे, तरीही त्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही, असे जेठमलानी म्हणाले. (supreme court verdict on rahul gandhi)

‘सत्य की हमेशा जीत होती है’

न्यायालयाच्या या आदेशानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, की “हा आनंदाचा दिवस आहे… मी आजच लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत चर्चा करेन.” या निर्णयानंतर काँग्रेसने, ‘सत्य की हमेशा जीत होती है’ असे ट्विट केले आहे. या ट्विटसोबत काँग्रेसने राहुल गांधी यांच्या हसमुख चेहऱ्यांचा फोटोही शेअर केला आहे. (Rahul Gandhi Defamation Case)

काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी संपर्क जयराम रमेश यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सत्य आणि न्यायाची पुष्टी करणारा असल्याचे म्हटले आहे. ”भाजपच्या संपूर्ण यंत्रणेने सातत्याने प्रयत्न करूनही राहुल गांधी यांनी हार न मानता, दबावाला न झुकता न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास दाखवला. हा भाजपसाठी एक धडा आहे: तुम्ही वाईट कृत्य कराल, पण आम्ही मागे हटणार नाही. आम्ही एक सरकार आणि पक्ष म्हणून तुमचे अपयश निदर्शनास आणून देत राहू. आम्ही आमच्या घटनात्मक आदर्शांचे पालन करू आणि आमच्या संस्थांवर विश्वास ठेवू ज्यांना तुम्ही नष्ट करू इच्छित आहात. सत्यमेव जयते!” असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button