Latest

Overdose : भारतात चाचण्याही उगीचच अन् उपचाराचाही ‘ओव्हरडोस’

backup backup

नवी दिल्ली/मुंबई : वृत्तसंस्था : खात्री नसलेल्या चाचण्या आणि स्वैर उपचार ही याआधी भारतात येऊन गेलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेची वैशिष्ट्ये तिसर्‍या लाटेतही बघायला मिळत आहेत. देशभरासह परदेशातील मिळून 35 डॉक्टरांनी ही बाब अधोरेखित करून केंद्रीय तसेच राज्यांच्या आरोग्य विभागाला एक खुले पत्र लिहिले असून, यातून खात्री नसलेल्या या उपचारपद्धती सरसकट अवलंबणे बंद करावे आणि रुग्णाच्या स्थितीनुरूप औषधोपचाराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे. (Overdose)

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. संजय नागराळ यांचीही स्वाक्षरी या पत्रावर आहे. कोरोना उपचार असो, चाचण्या असोत वा रुग्णालयात दाखल करणे असो, आपण सारेच अति करत आहोत. हॉर्वर्ड आणि जॉन हापकिन्समधील भारतीय मूळ असलेले डॉक्टरही पत्रलेखकांमध्ये सहभागी आहेत.

याआधीच्या दोन्ही लाटांमध्ये जे घडले, तेच तिसर्‍या लाटेत घडताना दिसत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना हलका औषधोपचार पुरेसा आहे. अनेक प्रकरणांतून तर औषधोपचार आवश्यकही नाही. असे असताना तिसर्‍या लाटेत रुग्णांसाठीच्या काही 'प्रिस्क्रिप्शन' आम्ही पाहिल्या आणि थक्क झालो.

दुसर्‍या लाटेत रुग्णांना अ‍ॅझिथ्रोमायसीन, डॉक्सिसायक्लिन, इव्हरमेक्टिन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, फेव्हिपिरावीरसारखे औषधांचे डोस रुग्णांना देण्यात आले. परिणामी कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकर मायकोसिससारख्या गंभीर आजारांचा सामना अनेकांना करावा लागला होता, यावर कॅनडातील साथरोग तज्ज्ञ डॉ. मधुकर पै यांनी बोट ठेवले आहे.

Overdose : देशात 2.64 लाख नवे रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या 6.7 टक्क्यांनी वाढून 2,64,202 वर पोहोचली. ओमायक्रॉनबाधितांची संख्याही 4,868 वरून 5,753 पर्यंत गेेली.कोरोना संसर्गितांची देशातील संख्या 3,65,82,129 झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 12,72,073 वर गेली आहे. देशभरात एका दिवसात 315 जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आतापर्यंतची मृत्यूसंख्या 4,85,350 झाली आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 36 मृत्यू, पाठोपाठ दिल्लीत 31, तामिळनाडूमध्ये 25 तर केरळमधील मृतांची संख्या 21 अशी होती.

राज्यात कोरोनाचे 43 हजार नवे रुग्ण

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. शुक्रवारी 43 हजार 211 इतके रुग्ण आढळले. मुंबईत 11 हजार 317 रुग्णांची नोंद झाली. 19 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात रुग्ण बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात सध्या 2 लाख 61 हजार रुग्ण सक्रिय आहेत. आजवर 71 लाख 24 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी राज्यात 238 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजवर 1605 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT