Latest

उस्‍मानाबाद : आरोपीस पकडण्यास गेलेल्‍या पोलिस पथकावर हल्‍ला; डोळ्यात चटणी टाकुन पाेलिसांना मारहाण

निलेश पोतदार

परंडा ; पुढारी वृत्तसेवा आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिस पथकाच्या डोळ्यात चटणी टाकुन काठया, कुर्‍हाडीने मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे गंभीर जखमी झाले. यासोबतच पथकातील अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना (सोमवार) रोजी परंडा शहरापासून ४ किलाेमीटर अंतरावरील कुर्डवाडी रोड लगतच्या पाटील वस्तीवर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औंदुंबर प्रकाश पाटील यांच्या शेतीच्या वादातून गुन्‍हा दाखल झाला हाेता. यावेळी पोलीस पथक पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे चौकशी करीता गेले. चौकशी दरम्यान तपास प्रमुख राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपातर हाणामारीत झाले. उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी अचानकपणे कोयता, दगड काठीने मारहान करून पाेलिस पथकावर हल्ला चढवला.

पथकातील महिला हेड काॅन्सटेबल शबाना मुल्ला यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तात्काळ पोलीसांचा ताफा पाटील वस्तीच्या दिशेने रवाना झाला. पोलीस कुमक घटनास्थळी पोहताच पाटील कुटूंबीयानी पोलीसांच्या डोळ्यात चटणी फेकून तुफान दगडफेक केली.  पोलीस उपनिरिक्षक राजकुमार ससाणे यांना घरात बंदी बनवून त्यांना काट्या कुर्‍हाडीने मारहाण केली. दोन तासाच्या थरारानंतर पाटील कुंटूबीयांच्या तावडीतून पोलीस निरीक्षक सासाणे यांना पोलिस कर्मचारी अजित कवडे, योगेश यादव सोडवण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळावरून पोलीसांनी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील फरार झाले. गंभीर जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यावर येथिल उपाजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT