Unemployment rate : महाराष्ट्रातील बेरोजगारी दर रोडावला! केंद्र सरकारची लोकसभेत माहिती | पुढारी

Unemployment rate : महाराष्ट्रातील बेरोजगारी दर रोडावला! केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील बेरोजगारी दर (यूआर) कमी झाला आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरातून श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली. सांख्यिकी आणि कार्यकम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० या वर्षात महाराष्ट्रात १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीसाठी सामान्य स्थितीनुसार बेरोजगारीचा दर कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर, श्रमिक लोकसंख्येचे प्रमाण (डब्ल्यूपीआर) वाढल्याचे दिसून आले. (Unemployment rate)

महाराष्ट्रातील सामान्य स्थितीनुसार गेल्या २ वर्षांतील १५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या श्रमिक लोकसंख्येचे प्रमाण २०१८-२९ मध्ये ५०.६% एवढा होता. हे प्रमाण २०१९-२० मध्ये ५५.७% टक्क्यांपर्यंत वाढले. तर, २०१८-१९ मध्ये असलेला बेरोजगारीचा दर ५.० टक्क्यांवरून २०१९-२० मध्ये ३.२ टक्क्यांपर्यंत खालावला असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) द्वारे २०१७-१८ पासून आयोजित ठराविक काळाने होणाऱ्या श्रम बल सर्वेक्षण (पीएलएफएस) द्वारे रोजगार आणि बेरोजगारीवरील डेटा संकलित केला जातो. (Unemployment rate)

या डेटाच्या आधारे केंद्राकडून ही माहिती सभागृहात सादर करण्यात आली आहे. रोजगार निर्मिती आणि रोजगारक्षमता सुधारण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह देशात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने विविध पावले उचलली आहेत, असे रामेश्वर तेली यांच्याकडून सांगण्यात आले.

Back to top button