नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी तुलना केल्यानंतर आता काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची स्थिती दयनीय होत चालल्यामुळे आरएसएस, भाजपला त्यांचा जुना मित्र मुस्लिम लीगची आठवण होत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. Mallikarjun Kharge On BJP
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज आणि मुस्लिम लीगला साथ दिली होती. त्यामुळेच भाजप आपला जुना इतिहास आठवून आता सामान्य जनतेच्या सहमतीने तयार झालेल्या आमच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी तुलना करीत असल्याचे खर्गे यांनी सांगितले. मोदी, शहा यांच्या पूर्वजांनी १९४२ च्या 'भारत छोड़ो' आंदोलनादरम्यान महात्मा गांधी, मौलाना आजाद यांचा विरोध केला होता. Mallikarjun Kharge On BJP
भाजपच्या वैचारिक नेत्यांनी १९४० मध्ये मुस्लिम लीग सोबत मिळून बंगाल, सिंधमध्ये सरकार स्थापन केले होते, असे खर्गे यांनी एक्सवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजांना पत्र लिहून १९४२ ची चळवळ दाबण्याची गोष्ट केली होती, अशी तोफही खर्गे यांनी डागली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावरही खर्गे यांनी टीका केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा देशातील १४० कोटी जनतेच्या आशा, आकांक्षाचे प्रतीक असून मोदी सरकारच्या १० वर्षांतील अन्यायपूर्ण काळाचा अंत करील, असेही खर्गे यांनी एक्सवर म्हटले आहे.
हेही वाचा