नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी "ना खाऊँगा, ना खाने दुंगा" म्हणतात पण त्यांना फक्त "सिर्फ भाजपा को खिलाऊँगा" म्हणायचे होते असे दिसते, अशी जळजळीत टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते की, एकूण इलेक्टोरल बाँड्सच्या पैशांपैकी एकट्या भाजपला जवळपास ५० % देणगी मिळाली. याउलट प्रमुख विरोधी पक्ष असताना काँग्रेसला केवळ ११ % निधी मिळाल्याचेही खर्गे म्हणाले. Mallikarjun Kharge On BJP
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी अनेक संशयास्पद देणगीदार आहेत. ही लोक कोण आहेत? या कोणत्या कंपन्या आहेत? ईडी, आयटी आणि सीबीआयच्या छाप्यांनंतरच इतक्या कंपन्यांनी देणगी का दिली? अशा कंपन्यांवर दबाव कोणी आणला? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तसेच भाजपच्या भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय चौकशीचीही त्यांनी मागणी केली. Mallikarjun Kharge On BJP
निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत, ही चिंताजनक बाब आहे. मात्र, बेकायदेशीररीत्या कोटय़वधींचा पैसा जमवणाऱ्या भाजपवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे इलेक्टोरल बाँड्स योजनेतून मिळालेल्या बेकायदेशीर प्रकारामुळे भाजपचीही बँक खाती तत्काळ गोठवण्यात यावीत, अशीही मागणी खर्गे यांनी केली आहे.
हेही वाचा