नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर बबनराव घोलप यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अद्याप निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे घोलप यांचे कार्यकर्ते संभ्रमात असून, सध्या मातोश्रीवरून घोलप यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे.
संबधित बातम्या :
शिर्डी लोकसभा मतदारसंघात घोलप निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यास पक्षाने नकार दिल्यामुळे घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची नाराजी लक्षात घेऊन शिवसेनेचे संजय राऊत यांनी त्यांना भेटीसाठी बोलावले होते. यानंतर आपण दोन दिवसांत उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, चार दिवस उलटूनही अद्याप भेटीचे निमंत्रण न आल्यामुळे घोलप कार्यकर्ते संतप्त आहेत. दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील घोलप यांच्या विरोधातील गटाला मातोश्रीवर अगोदर पाचारण केले. त्यांच्या भेटीनंतर घोलप यांच्यासोबत चर्चा होईल, अशी माहिती राजकीय गोटातील सूत्रांनी दिली आहे.
शिर्डी मतदारसंघातून घोलप लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु ऐनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे घोलप हे नाराज झाले. तसेच शिर्डी लोकसभा मतदार संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली. या दोन्ही निर्णयांत घोलप यांना पक्षश्रेष्ठींनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत्या. दरम्यान, घोलप काय भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांचे व त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले.
हेही वाचा :