Latest

NRF : पंजशीर युद्धात NRF चे प्रवक्ता फहीम दश्तींची हत्या

backup backup

काबूल, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानमध्ये अहमद मसूदचा गट असणारी नॉर्दन रेझिस्टन्स फोर्स (NRF) आणि तालिबान यांच्यातील संघर्ष पंजशीरमध्ये वाढत आहे. नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दश्ती तालिबानशी युद्धात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी तालिबान युद्ध लढत आहे. तेव्हापासून दश्ती NRF चे प्रवक्ता म्हणून नॉर्दन आघाडीची बाजू मांडत होते.

फहीम दश्ती जवळपास ३० वर्षांपासून NRF सोबत काम करत होते. २००१ साली जेव्हा अल कायदा आणि तालिबाननं मिळून नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांची हत्या केली, तेव्हा फहीम दश्ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर आता बरोबर २० वर्षांनंतर फहीम दश्ती तालिबानशी झालेले युद्धात मारले गेले आहेत.

वयाच्या ८ व्या वर्षी फहीम दश्ती यांनी एका लग्न समारंभात पहिल्यांदा नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूदला भेटले होते. १९८० च्या दशकात अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखालील मुजाहिदीनचा सोव्हिएत युनियनशी संघर्ष झाला होता. यातूनच प्रेरणा घेत दश्ती यांनी १९९० मध्ये नॉर्दन आघाडीत प्रवेश केला. ९ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाचे काही दहशतवादी पत्रकार बनून अहमद शाह मसूद यांच्या भेटीला आले होते.

दरम्यान त्यांनी मसूद यांच्या रुममध्ये मोठा विस्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात फहीम गंभीररित्या भाजले होते. पण त्यांचा प्राण वाचला होता. अमेरिकेच्या ९/११ हल्ल्याच्या दोन दिवस आधी अहमद शाह मसूदची हत्या झाली होती. फहीम दश्ती हे एक पत्रकार होते. एक तरुण पत्रकार म्हणून त्यांना नॉर्दन आघाडीच्या घडामोडीबाबत रिपोर्टींग करण्याचं काम देण्यात आलं होतं.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

SCROLL FOR NEXT