Latest

आता ‘महाभूमी’वर एका क्लिकवर मिळणार दाव्यांचीही माहिती, जाणून घ्या अधिक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जमीन खरेदी करताय… मग संबंधित जमिनीवर न्यायालयात दावा सुरू आहे की नाही याची माहिती घेणे आवश्यक आहे… आता ही माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने राज्यात मालमत्ता आणि जमिनीच्या दाव्यांची न्यायालयात सुरू असलेली माहिती 'महाभूमी' संकेतस्थळावर देण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे आता मालमत्ता अगर जमीन खरेदी किंवा विक्रीवेळी होणारी नागरिकांची फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे. 'महाभूमी' या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्व्हे नंबर टाकल्यास त्या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती लागलीच समजणार आहे.

गावकी आणि भावकीमध्ये जमिनीचे वाद सुरू असतात. जमीन खरेदी करतेवेळी या जमिनींचे दावे न्यायालयात सुरू आहेत की नाही याची माहिती मिळत नाही. दसतनोंदणी झाल्यानंतर जमिनीमध्ये वाद असल्याचे लक्षात येते. तोपर्यत सर्व व्यवहार पूर्ण झालेला असतो. अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता खरेदी करणार्‍या नागरिकांची फसवणूक होते. त्याचप्रमाणे जमीन खरेदी विक्री करताना वकिलांकडून जमिनीचा सर्च रिपोर्ट घेतला जातो. मात्र, अनेकदा या रिपोर्टमध्ये जमिनीबाबतचे न्यायालयीन वाद सुरू असल्याचे दिसत नाही. सातबारा उतारा तसेच फेरफार उतार्‍यावरदेखील न्यायालयीन वाद सुरू असल्याची नोंद नसते. त्यामुळे खरेदीदाराची फसवणूक होते आणि पुन्हा न्यायालयीन वाद निर्माण होतात.

मागील काही वर्षांपासून असे फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाने महसूल व दिवाणी न्यायालयातील जमीनविषयक दावे सर्व्हे नंबर निहाय लिंक तयार केली आहे. महाभूमी या सकेतस्थळावर राज्यातील जमिनीच्या दाव्याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

अशी असेल प्रक्रिया…

महसूल विभागात एखाद्या अधिकार्‍याकडे दावा दाखल केल्यानंतर संबंधित लिपिक या दाव्यांची माहिती गाव, तालुका, जमिनीचा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर दाव्याची माहिती भरणार आहे. ही माहिती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर लिंक केली जाणार आहे. नागरिकांनी 'महाभूमी' या संकेतस्थळवर जाऊन कोर्ट केसेसला क्लीक करावे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडावे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक (सिटी सर्व्हे नंबर) टाकल्यास संबंधित दाव्यांची माहिती मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT