धुळे : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भल्यासाठी केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. मात्र विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरीही जनता 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे मत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले.
धुळ्यात आज भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार समवेत संवाद साधला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील तसेच सहचिटणीस योगेश मैंद, विजय बनसोडे, यशवंत येवलेकर, महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील सरकारच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे असंख्य निर्णय घेण्यात आले. मुद्रा लोन च्या माध्यमातून 41 लाख तरुणांना लाभ देण्यात आला आहे. विशेषता अकरा लाख विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून यातून विविध शाखेतील प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मदत झाली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जनतेला सर्व योजनांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हास्तरावर आता एक मदत केंद्र स्थापन केले जाणार असून या मदत केंद्राच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात आता सर्व विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी एकत्र येत आहे. मात्र वास्तविक पंतप्रधान मोदी यांना विरोधक घाबरले आहेत. जनतेच्या हिताचे असंख्य निर्णय सरकारने घेतले असल्यामुळे विरोधकांनी कितीही मोट बांधली तरीही त्याचा उपयोग होणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा :