अहमदनगर शहरातील घरकुलाचे तीन प्रकल्प झाले रद्द | पुढारी

अहमदनगर शहरातील घरकुलाचे तीन प्रकल्प झाले रद्द

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात चार घरकुल प्रकल्प सुरू झाले होते. त्यात लाभार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आणि कोविड काळापासून साहित्याच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ यामुळे ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दशविली आहे. आगरकर मळ्यातील प्रकल्पासाठी अनेक वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदार न मिळाल्याने अखेर तीन प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात केडगाव, नालेगाव, आगरकरमळा, संजयनगर झोपडपट्टी परिसरात घरकुल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील केडगाव व नालेगाव येथील प्रकल्पाची निविदा झाली होती. संजयनगर झोपडपट्टीजवळील प्रकल्पातील काही सदनिका बांधून झाल्या असून, त्यातील 33 सदनिका लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. अन्य सदनिकांचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांना अवघा एक लाख रुपये वाटा भरावा लागला. त्यांना सामाजिक संस्थांनी मदत केली.

दरम्यान, केडगाव, नालेगाव, आगरकर मळा येथील प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. कोविड काळापासून अनेक दिवस काम प्रलंबित राहिल्याने सिमेंट, वीट, खडी, स्टिल अशा साहित्याचे दर वाढले. त्यामुळे ठेकेदाराने मंजूर रकमेत काम करण्यास असमर्थता दर्शविली. आगरकर मळ्यातील प्रकल्पासाठी अनेक वेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदार मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने तसा अहवाल शासनाला दिला. शासनाने तीन प्रकल्प रद्द केल्याचे समजते.

12 हजार अर्ज

घरकुल बुकिंगसाठी सुरुवातीपासून 12 हजार अर्ज आले होते. लाभार्थ्यांची संख्या पाहता छाननी करून सोडत काढण्यात आली. लाथार्थी निश्चित करण्यात आले. तरीही लाभार्थ्यांकडून बुकिंगला थंड प्रतिसाद मिळाला. घरकुल प्रकल्पाचे काम लवकर होत नसल्याचे पाहून अनेक लाभार्थ्यांनी पैसे परत घेतले. ठेकेदार काम करीत नसल्याने लाभार्थ्यांचे बुकिंगसाठी घेतलेले पैसे परत देण्याची नामुष्की पालिकेवर आली.

महापालिकेच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजनेचे चार प्रकल्प मंजूर होते. त्यातील तीन प्रकल्प शासनाने रद्द केले आहेत. बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविली होती.

– गणेश गाडळकर, प्रकल्पप्रमुख

हेही वाचा

Dhule Pimpalner : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस जुलैमध्ये पुन्हा नगरला

राहुरी : महसूल हे भाजपचे अधिकृत कार्यालय झाले का? आ. तनपुरे

Back to top button