नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, याचिका दाखल करताना शरद पवार गटाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे यावरील सुनावणीस विलंब होण्याची शक्यता आहे.
आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी न्यायालयाने या प्रकरणाला क्रमांक दिलेला नाही. कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्याची विनंती शरद पवार गट न्यायालयाला करू शकत नाही. या याचिकेवर लवकर सुनावणी हवी असल्यास, सर्वप्रथम त्यांना याचिकेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. मात्र, तशी घाई शरद पवार गटाला असल्याचे दिसलेले नाही.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार गट न्यायालयात जाऊ शकतो याचा अंदाज अजित पवार गटाला आला होता. त्यामुळे अजित पवार गटाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होईल तेव्हा अजित पवार गटाचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.
हेही वाचा :