

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : येत्या 27 फेब्रुवारीला होणार्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने सर्वांना धक्का देत प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची मुदत संपण्यास तीन वर्षे उरली असताना पटेल यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे या तीन उमेदवारांची घोषणा केल्यावर चौथा उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवसेनेने (शिंदे गट) मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने डॉ. गोपछडे यांना उमेदवारी देऊन आयारामांबरोबरच निष्ठावान कार्यकर्त्यांचीही कदर केल्याचा पक्षात संदेश दिला आहे.
चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यापासून भाजपच्या वतीने त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार, अशी चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून आणि नांदेड लोकसभेतून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघ सोडलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन दूर केली आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वैद्यकीय विभागाचे महाराष्ट्र प्रभारी असलेले मराठवाड्यातील नांदेडचे डॉ. गोपछडे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. ते एमडी डॉक्टर असून, त्यांनी कोरोना काळात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. मराठवाड्याचे एकूण दोन उमेदवार देऊन भाजपने मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केल्याचे यातून दिसते.
डॉ. मनमोहन सिंग मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्याला ठाकरे गटाकडून विरोध होणार असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना राज्यसभेचे गिफ्ट मिळाले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी धक्कातंत्र अवलंबून प्रफुल्ल पटेल यांना पसंती दिली आहे. पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच 3 वर्षे आधी ते खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहेत. काही तांत्रिक मुद्दे असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. कोणत्याही स्वरूपाचा वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचे सांगण्यात येते. या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ यांच्यासह आठ ते दहाजण इच्छुक होते. त्यामुळे अन्य कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले असावे, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे. त्याचबरोबर आता महायुतीच्या सर्व उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत.
अलीकडेच मुंबई काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई काँग्रेस खिळखिळी झाली असताना, मुंबईतून काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाने हांडोरे यांना संधी दिल्याचे सांगितले जात आहे. प्रदेश काँग्रेसमधील एक प्रमुख दलित चेहरा असलेल्या हांडोरे यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने दलित समीकरण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जून 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. आता पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देऊन काँग्रेसने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.