शिवसेनेचे आजपासून कोल्हापुरात राष्ट्रीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी

'Eknath Shinde
'Eknath Shinde

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन प्रथमच दि. 15 ते 16 असे दोन दिवस कोल्हापुरात होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत. शनिवारी (दि. 17) गांधी मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात चौकाचौकांत भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. देशभरातील शिवसेनेचे पदाधिकारी अधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होत आहेत. भगवे ध्वज, कमानींमुळे अवघे कोल्हापूर शिवसेनामय झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक मंत्री गुरुवारपासून शनिवारपर्यंत कोल्हापुरात येणार असल्याने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनानेही सुरक्षेसाठी खरबदारी घेतली आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर आदी महाअधिवेशनाचे संयोजन करत आहेत. महासैनिक दरबार येथे गुरुवार व शुक्रवारी (दि. 15 व 16) अधिवेशन होणार आहे. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. अधिवेशनामुळे कार्यकर्त्यांतही प्रचंड उत्साह आहे. सर्किट हाऊसमध्ये दिवसभर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नियोजनासाठी बैठका सुरू होत्या. अधिवेशनाच्या नियोजनासाठी मुंबईतील शिवसेनेचे सचिव व इतर पदाधिकारी कोल्हापुरात ठाण मांडून आहेत. सर्वांनी सायंकाळी अधिवेशनस्थळाची पाहणी केली.

विविध उद्घाटनांचे आयोजन

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यात शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी, रंकाळ्यासाठी 20 कोटी रु. निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळासाठी 10 कोटी रुपयांसह इतर निधीचा समावेश आहे. कोल्हापुरात कन्व्हेंशन सेंटरला मान्यता दिली असून, त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा व राज्य नगरोत्थान योजनेतून महापालिकेला कोट्यवधीचा निधी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्घाटने करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक मंत्री कोल्हापुरात येणार असल्याने महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्किट हाऊस परिसर, महासैनिक दरबार हॉल, स्टेशन रोड, जिल्हाधिकारी कार्यालय रोडसह इतर चौक चकाचक केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news