पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळची औद्योगिक राजधानी कोचीतील ब्रह्मपुरम कचरा प्रक्रिया केंद्राला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती, ती अद्याप विझलेली नाही. यामुळे कोचीचा काही भाग धुराच्या लोटांनी व्यापला आहे. किनारपट्टीवरील हवेची गुणवत्ता खालावल्यानंतर कोची कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी आग विझवण्यासाठी भारतीय नौदलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका संरक्षण प्रवक्त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, नौदल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे.
संरक्षण प्रवक्त्याने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "भारतीय नौदल केरळ सरकारसोबत ब्रह्मपुरम एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या प्रयत्नांमध्ये सामील झाले आहे. दक्षिण मुख्यालय नौदल कमांड आपल्या कुशल कर्मचारी आणि विशेष उपकरणांसह परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. दरम्यान, एर्नाकुलम जिल्हा प्रशासनाने सांगितले की, प्लास्टिक कचऱ्याची आग लवकरच आटोक्यात आणली जाईल. एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी डॉ. रेणू राज यांनी सांगितले की, नागरी प्रशासन आज परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले तर आग विझवण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जाईल. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत हवाई दलाशी चर्चा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोचीचे रहिवासी रणजीत टँपी म्हणाले की, विषारी धुरामुळे शहर आणि परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
हेही वाचा :