भारतीय जवान हवेत उडणार; जेटपॅक सूटची चाचणी यशस्‍वी, विशेष मोहिमांसाठी होणार वापर | पुढारी

भारतीय जवान हवेत उडणार; जेटपॅक सूटची चाचणी यशस्‍वी, विशेष मोहिमांसाठी होणार वापर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय लष्कर आपल्या जवानांना लवकरच जेटपॅक सूटस् उपलब्ध करून देणार आहे. जेटपॅक सूटच्या साहाय्याने जवान पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकतील. विशेष मोहिमांसाठी त्यांचा वापर होईल. जेटपॅक सूटचे 44 नग पहिल्या टप्प्यात उपलब्ध केले जातील.

जेटपॅक सूटस्मध्ये एक इंजिन असते. बॅगपॅकप्रमाणे ते पाठीवर घातले जाते. हे परिधान केले की, जवान समुद्रात युद्धनौकेतून हवेत आणि जमिनीवरून कुठल्याही ठिकाणी हवेत उडू शकेल. त्याचा ताशी कमाल वेग 50 कि.मी. असेल. भारतीय लष्कराने ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या जेटपॅक सूटची चाचणी प्रक्रियाही सुरू केली आहे. आग्रा येथील इंडियन आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूलमध्ये (एएटीएस) या उपकरणाचे प्रात्यक्षिक पार पडले आहे. जवानाला उड्डाणाची दिशा व हालचाली नियंत्रित करता याव्यात म्हणून सूटला तीन लहान जेट इंजिन असतात. जवान एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत उडू शकतील.

कंपनीचे रिचर्ड ब्राऊनिंग यांनी ढोलपूर येथील आर्मी स्कूलमध्ये दिलेल्या प्रात्यक्षिकादरम्यान 51 कि.मी. अंतर कापले. रस्ते, इमारती आणि नद्याही त्यांनी ओलांडल्या. सूटच्या मदतीने 12 हजार फूट उंचापर्यंत उडता येते.

चीन, पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी टेहळणीकरिता ही सामग्री मोलाची ठरेल. 100 रोबोटिक खेचर खरेदी केले जातील. स्वत: सगळी कामे करू शकेल, असा चार पायांचा रोबो ताफ्यात दाखल होईल. बिघाड झाल्यास तोच स्वत:ची दुरुस्तीही करेल.

Back to top button