एच-3 एन-2 व्हायरसच्या रुग्णसंख्येत देशभर वाढ | पुढारी

एच-3 एन-2 व्हायरसच्या रुग्णसंख्येत देशभर वाढ

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : देशावरील कोरोनाचे संकट दूर होत चालले असताना फ्लूची एक नवी लाट पसरली आहे. ताप, खोकला, आणि फुफ्फुसातील संसर्गाने घरोघरी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. या आजारात मृत्यूच्या शक्यतेचे प्रमाण अत्यल्प असले, तरी हा विषाणू सध्या संशोधकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

तापमानामध्ये होणारे बदल, प्रदूषण आणि प्रतिकारक शक्तीची कमतरता या आजाराला पोषक ठरते आहे. रुग्णाला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागत आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’ या संस्थेने दिली आहे. कोल्हापुरातही या साथीने बेजार झालेले अनेक रुग्ण घराघरांमध्ये आढळत आहेत.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडे (आयसीएमआर) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा विषाणू एच-3 एन-2 स्वरूपाचा आहे. एन्फ्ल्यूएन्झा-फ्लूचा एक उपविषाणू म्हणून तो ओळखला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये संपूर्ण देशात हा विषाणू हवेतून संक्रमण करतो आहे. लक्षणे दिसताच रुग्णालयाशी संपर्क साधून त्यावर उपचार झाले, तर रुग्ण गंभीर होण्यापासून वाचू शकतो, असे वैद्यकीय अधिकार्‍यांचे मत आहे.

आजाराची लक्षणे : अधिक ताप, खोकला, छातीमध्ये कफ, अंगदुखी, धाप लागणे, आवाज बसणे.

घ्यावयाची काळजी : मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे आणि स्वच्छतेचे नियम पाळून, सकस आहार व भरपूर जलपदार्थांचे सेवन करणे.

Back to top button