औरंगाबाद; भाग्यश्री जगताप : औरंगाबादमध्ये श्री रेणुका मातेची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. यामध्ये सर्वात प्राचीन असलेले केसरसिंगपुरा येथील रेणुका मातेचे मंदिर आहे. तसेच सिडको एन-९ येथील व बीड बायपास येथील रेणुका माता मंदिर यांचाही समावेश आहे. प्रत्येक मंदिराचा वेगळपणा आहे, त्याबद्दल जाणून घेवूया.
शहरातील केसरसिंगपुरा येथील राजस्थानी पद्धतीचे श्री रेणुका मातेचे मंदिर पुरातन मंदिर असून या ठिकाणी शिवशक्तीचा वास आहे. रेणुका माता व महादेवाचे मंदिर हे एकाचवेळी स्थापन करण्यात आले. मुघलकालिन असलेल्या या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिराला कळस व कमान नव्हती. कारण, मुघल साम्राज्यात मंदिरे पाडली जायची. त्यामुळे या मंदिराला कळसाऐवजी घुमटासारखा आकार देण्यात आला होता. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने कळस उभारण्यात आला आहे. मंदिरामध्ये लक्ष्मी देवी व कालिका देवीच्या मुळ मूर्ती होत्या. श्री क्षेत्र सोनई शक्ती पिठाचे हरिहरानंद अण्णा महाराज यांनी या मूर्तीला रेणुका देवीचा आकार दिलेला आहे. शहरातील पहिले रेणुका मातेचे हे मंदिर असून या मंदिरात तांबुळाचा प्रसाद वाटप करण्यात येतो, अशी माहिती मंदिराचे पुजारी डोलारे गुरूजी यांनी दिली.
जळगाव रोडवरून जात असतांना लाखो पावले क्षणभर दोन्ही हात जोडून थांबतात, नतमस्तक होतात असे हे प्रतिमाहुर म्हणून ओळखले जाणारे एन-९ सिडको येथील रेणुका मातेचे मंदिर. दाक्षिणात्य शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले, ४० ते ४५ फुट उंचीचे मंदिर आणि त्यामध्ये सव्वाचार फुट ऊंचीची शेंदूर वर्णीय मूर्ती भाविकांना मंत्रमुग्ध करते. श्री रेणुका माता मंदिराची स्थापना १५ एप्रिल १९८४ ला झाली असून श्री क्षेत्र सोनई शक्ती पिठाचे हरिहरानंद महाराज यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९८९ रोजी प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. मंदिराचा गाभारा २०० किलो चांदीने मढवलेला असून त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. श्री रेणुका माता मंदिराच्या बाजूला श्री कालभैरवनाथ मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराला सिडकोकडून सामाजिक उपक्रमांतर्गत ६ हजार स्के. फुट जागा मिळाली असून त्या जागेमध्ये वैद्दकीय सेवा, अन्नछत्र, अभ्यासिका, डे केअर सेंटर या सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त बाबुराव वाडेकर यांनी दिली.
बीड बायपास रोड, सातारा परिसर येथील रेणुकामातेचे मंदिर शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरानंद महाराज हे अण्णा महाराज नावानेही ओळखले जातात. त्यांनी आयुष्यभर पायी फिरून देशातील अनेक देवींच्या स्थानांची ओळख भक्तांना करून दिली. अनेक देवींचा लुप्त झालेला मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि ती नावारूपाला आणली. बीड बायपास येथे अण्णा महाराज एका झोपडीत मुक्कामाला होते. तेथे त्यांनी अनुष्ठान केले. याच ठिकाणी त्यांनी १९९८ साली रेणुकामातेचा तांदळा करून देवीची स्थापना केली. या मंदिरात रेणुका देवीचा तांदळा आहे. त्याच्याखाली तळघरात महादेवाची पिंड आहे. खाली शिव आणि वर आदिशक्ती देवी असणारे हे शहरातील एकमेव मंदिर आहे. नवरात्रोत्सवात मंदिराच्या परिसरात दरवर्षी देवीची स्थापना करून अतिशय सुंदर देखावा तयार करण्यात येतो. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पार पडतात.
हेही वाचा :