धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील महिला या राज्यात सर्वांत जास्त मद्यपी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणेने दिला आहे. या अहवालातून राज्य व केंद्र शासनाने धुळे जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंञ केल्याचा आरोप करीत आज राष्ट्रवादी काँग्रेसने धुळ्यात आंदोलन केले. हा अहवाल तातडीने शासनाने मागे घ्यावा अन्यथा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन छेडले. नुकताच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणेने एक अहवाल दिला आहे. ज्यामध्ये धुळे जिल्ह्यातील महिला या मद्यपी आहेत. तसेच राज्यात सर्वांत जास्त धुळे जिल्ह्यातील महिला या दारु पितात, असे म्हटले आहे. याचा निषेध राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
या अहवालामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच महिलांचा अपमान झाला असून राज्यामध्ये धुळ्यातील महिला या चेष्ठेचा विषय झाला आहे. हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्याचा अपमान आहे. सदर अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला याचा खुलासा झाला पाहिजे. धुळे जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्वे केला. ही माहिती जनतेसमारे येणे गरजेचे आहे, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या समोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. हा अहवाल म्हणजे जिल्ह्याच्या महिलांविषयी असलेले एक षडयंत्र आहे. हा अहवाल त्वरीत मागे घ्यावा. अन्यथा अहवालाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत डोमाळे, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र चौधरी, रईस काझी, मनोज कोळेकर, भटू पाटील, उमेश महाजन, नजीर शेख, फिरोज पठाण, गोरख कोळी, रामेश्वर साबरे, कुणाल पवार, जगन ताकटे, अंबादास मराठे, मयुर देवरे, भूषण पाटील, दानिश पिंजारी, संजय सरग, गोलू नागमल, निलेश चौधरी, रमनलाल भावसार, सरोज कदम, तरुणा पाटील, निर्मला शिंदे, वंदना केदार, स्वामिनी पारखे,निखिल मोमाया, निलेश चौधरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.