

खानिवडे; विश्वनाथ कुडू : पालघर जिल्ह्यातील वैतरणा खाडीच्या नदीपात्रातील जुळी बेटावर नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या खारफुटी म्हणजेच कांदळवणाच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. यामुळे एकसारख्या भासणार्या खारफुटीच्याही प्रजाती असल्याचे पुढे आले आहे. तर या नऊ प्रजाती साधारण दीडशे ते दोनशे वर्षपूर्वीच्या जुन्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच या ठिकाणी उत्तमरित्या वाढलेली कांदळवने आणि ह्या प्रजाती दृष्टीस पडत आहेत.
सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावलेल्या वैरतणेचा अरबी समुद्रापर्यंतचा जो प्रवास आहे. त्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच समुद्राला
मिळताना वसई आणि पालघर तालुक्याच्या सीमेवरील नदीकाठी हे जुळी बेट आहे. वैतरणा हि नदी कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब व
मोठी नदी असून ही नदी ज्या ठिकाणी समुद्रात विसर्जित होते तिथला जैव विविधता समृद्ध प्रदेश म्हणजे वैतरणाखाडी म्हणून ओळखली जाते. आजवर न उलगडलेल्या कांदळवनांच्या अनोख्या परिसंस्थांचा अधिवास या खाडीला लाभला असल्याने या भागाला आता अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून कांदळवन संवर्धन हि संकल्पना पुढे येत आहे. खाडी क्षेत्राच्या भोवती पालघर तालुक्यातील दातीवरे आणि टेंभीखोडावे व वसई तालुक्यातील विरारजवळील चिखल डोंगरी, मारांबळ पाडा, नारंगी ही गावे वसली आहेत. अंदाजे 106 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले असून 96 हेक्टर क्षेत्रावर नारंगी गावच्या गावकर्यांकडून पावसाळी शेती केली जाते. 202 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या बेटावर कांदळवणांच्या एकूण नऊ प्रजाती सापडतात.
याशिवाय आठ कांदळवन सहयोगी प्रजाती पाहायला मिळतात. काही सस्तन प्राण्यांचा अधिवास या बेटावर आढळतो. साधारणपणे 28
जातीच्या पक्ष्यांची नोंद या बेटावरून करण्यात आलेली आहे. त्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे फिशर अर्थात काळ्या टोपीचा खंड्या. या
समृद्ध जैवविविधतेमुळेच वनविभागाच्या मंग्रो फाउंडेशनकडून जुली बेटावर निसर्ग पर्यटन विकसित होऊ घातले आहे. यासाठी मारांबळ पाडा गावात कांदळवन सहव्यवस्थापन समिती तयार करून गावकर्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई व पालघर तालुक्यातील वैतरणा या खाडीत प्रामुख्याने दोन बेटे आहेत. एक वाढीव आणि दुसरं जुळी बेट या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्रात किनारपट्टीवर आजपर्यंत कधीही न नोंदवलेली समृद्ध कांदळवनांची परिसंस्था या बेटावर आहे. या बेटावर कांदळवणांच्या एकूण नऊ प्रजाती सापडतात. याशिवाय आठ कांदळवन सहयोगी प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजाती साधारण दीडशे ते दोनशे वर्ष जुनी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये समाधान आहे.