नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
मनमाड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रामगुळणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावी लागले. त्यांचा संसार वाहून गेल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने आ. सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी त्वरित पूरग्रस्त भागास भेट देत पूरग्रस्तांची चौकशी करत घटनास्थळाची पाहणी केली.
पूरग्रस्त कुटुंबियांची परिस्थिती पाहता आमदार सुहास (अण्णा) कांदे यांनी त्वरित प्रत्येक कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा वस्तूंचे वाटप करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार शुक्रवारी (दि.23) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे प्रत्येक पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किराणा किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटीचे सदस्य राजाभाऊ भाबड, वाल्मिक आंधळे, सुभाष माळवतकर, आमिन पटेल, बाळा सांगळे तसेच शिवसैनिक, शिवसेना महीला आघाडीच्या उज्वला खाडे, संगीता बागुल, विद्या जगताप आदी उपस्थित होते.