नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर हवाईतळ… लढाऊ ध्रुव, चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर अवघ्या काही क्षणांमध्ये शत्रूचा तळ नेस्तनाबूत करत वायूदलातील जवानांनी आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. यातून त्यांनी कोणतेही आव्हान परतवून लावण्यासाठी 'है तयार हम' असा संदेशच दिला. यावेळी लढाऊ हेलिकॉप्टर्स उडविण्याचे खडतर प्रशिक्षण घेतलेले ५६ अधिकारी समारंभपूर्वक वायूदलात दाखल झाले.
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅटस्) ३८ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा गुरुवारी (दि. १) पार पडला. आर्मी एव्हिएशन कोअरचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कॅटस्चे बिग्रेडिअर संजय वढेरा आणि एव्हिएशन डीजी डी. के. चाैधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्कूलच्या इतिहासात प्रथमच हे तिन्ही कार्स पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पथसंचलनाचे सादरीकरण केले.
लेफ्टनंट जनरल सुरी यांनी मार्गदर्शनात सांगितले की, सैन्यदलात बदलत्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धुव्रसारखी हलक्या वजनाची हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येत असून, देशासाठी ही काैतुकास्पद बाब आहे. सैन्यदलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलादेखील विविध पदांवर कार्यरत असून, देशाला त्यांचा अभिमान आहे. वायूदलात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी देशसेवेसाठी तत्पर राहावे, असा सल्लाही सुरी यांनी प्रशिक्षणार्थींना केला.
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये ५६ अधिकाऱ्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये ३२ अधिकाऱ्यांनी कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स कोर्स पूर्ण केला. सात अधिकाऱ्यांनी क्वालिफाइड फ्लाइग इन्स्ट्रक्टर, तर १८ अधिकाऱ्यांनी बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट फ्लाइंग इन्स्ट्रक्टरचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये ४ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात तीन महिला कॅप्टनपदी व १ मेजरपदी आहे. या सर्वांचा समारंभपूर्वक वायूदलात समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे नायजेरियाचे मेजर ऑफोदिल यांनीही प्रशिक्षण घेतले.
बन्सलांनी काेरले 'चित्ता'वर नाव
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या प्रशिक्षणात अव्वल ठरलेले कॅप्टन नमन बन्सल यांनी मानाची चांदीच्या चित्ता ट्रॉफीवर नाव कोरले. मेजर अभिमन्यू गणचारी यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी प्रदान करण्यात आली. नवनीत जोशी व लेफ्टनंट कर्नल पुनीत नायर यांना ब्रिगेडियर के. व्ही. शांडिल ट्रॉफीने सन्मानित केले गेले. याशिवाय कॅप्टन राहुल मलिक, कॅप्टन चिट्टी बाबू आर आणि कॅप्टन जयेश सक्सेना यांनाही मान्यवरांच्या हस्ते विविध ट्राॅफी प्रदान केल्या.
महाडिक यांची यशाला गवसणी
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये चार महिला अधिकाऱ्यांनी खडतर प्रशिक्षण घेतले. शहीद मेजर महाडिक यांच्या पत्नी कॅप्टन गौरी महाडिक यांनी प्रशिक्षण घेत यशाला गवासणी घातली. कॅप्टन अनुमेहा, कॅप्टन मलिका नेगी आणि कॅप्टन सुजाता आर्य यांनीही हेलिकॉप्टर उड्डाणासह अन्य प्रशिक्षण पूर्ण केले. कॅप्टन आर्य यांचे पती विवेक आर्य हेही लष्करात मेजरपदावर कार्यरत आहेत.