संगमनेर : रिक्षामधून होतेय बेकायदेशीर वाळू वाहतूक | पुढारी

संगमनेर : रिक्षामधून होतेय बेकायदेशीर वाळू वाहतूक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रातून दिवसाढवळ्या राजेरोसपणे कालबाह्य झालेल्या रिक्षांमधून दिवसा ढवळ्या बेकायदेशिररित्या वाळूची वाहतूक होत आहे. याकडे महसूल आणि पोलिस प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर राज्यात अवैधतरित्या सुरू असणारी वाळूची वाहतूक बंद केली आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहने दिसतील तिथून पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ना. विखे यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत सर्वच महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना धाडले आहे. त्यामुळे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

संगमनेर तालुक्यात डंपर, ट्रॅक्टर, पिकअप या वाहनांतून होणारी अवैध वाळूची वाहतूक सध्या स्थितीला बंद झालेली असली तरी आता काही वाळू तस्कर चक्क गाढवांवरून तसेच कालबाह्य झालेल्या जुन्या रिक्षांमधून प्रवरा आणि म्हाळुंगी नदीपात्रातून वाळू वाहत आहेत. याकडे महसूल व पोलिस प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नगर येथून हे वाळू तस्कर पाच ते सात हजार रुपयांना कालबाह्य झालेल्या रिक्षा खरेदी करून संगमनेरात आणत आहेत. या रिक्षांमधून 15 ते 20 वाळूने भरलेल्या गोण्या वाहत असल्याचे पोलिस व महसूलच्या कर्मचार्‍यांना दिसत असतानाही याकडे ते ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे.

प्रवरा नदी परिसरात सकाळी, संध्याकाळ फिरण्यासाठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा परवाना नसतानाही समोरून कोणी आले आहे की नाही, हे न पाहता अगदी सुसाट वेगाने या रिक्षा वाळू घेवून जात असतात.
त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याकडे सुद्धा या अधिकार्‍यांचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळू तस्करांची मग्रुरी वाढली आहे. या वाळू तस्करांना लगाम घालण्यासाठी आता तरी महसूल विभाग कडक पावणे उचलणार आहे की नाही? की मह सूलमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, याकडे आता पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.

पत्रकारांना दमबाजी.. तस्करावर कारवाई करा..!

प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या कालबाह्य झालेल्या रिक्षातून वाळू वाहतूक करणार्‍या रिक्षाचे फोटो घेणार्‍या दोघा पत्रकारांना एका वाळू तस्करांनी दमबाजी करत ओळखपत्र मागितल्याच्या निषेधार्थ संगमनेर श्रमिक पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना निवेदन दिले. या वाळू तस्कराचा शोध घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संगमनेर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरक्ष मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे, सदस्य अमोल मतकर, भारत रेघाटे, सतीश आहेर, सचिन जंत्रे, अंकुश बुब व पत्रकार सुखदेव गाडेकर आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button