नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत नाशिक शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना 'मैं भी डिजिटल ४.०' मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक महापालिकेकडून करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे.
या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे हे आहे. लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करताना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅशबॅक प्राप्त होणार आहे. याकामी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा, याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिक शहरात दि. १७ फेब्रुवारीपर्यंत 'मैं भी डिजिटल ४.०' ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पीएम-स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु, अद्यापपर्यंत डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथविक्रेत्यांनी जवळच्या मनपा विभागीय कार्यालयात एनयूएलएम कक्षाशी संपर्क साधून डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त डिजिटल ऑन-बोर्डिंगद्वारे मिळणाऱ्या कॅशबॅकचा लाभ घेता येणार असल्याचे मनपा उपआयुक्त करुणा डहाळे यांनी कळविले आहे.