राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून 'सर्वोच्च' सुनावणी; घटनापीठ घेणार नियमित सुनावणी | पुढारी

राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून 'सर्वोच्च' सुनावणी; घटनापीठ घेणार नियमित सुनावणी

नवी दिल्ली,  पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सत्तासंघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ मंगळवार (दि.१४) पासून नियमित सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम.आर.शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.नरसिंहा यांचा समावेश असलेल्या घटनापीठसमोर ही सुनावणी सकाळी १०.३० वाजता घेण्यात येईल. अशात सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार? याकडे राज्यसह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजप सोबत घटनाबाह्य सरकार स्थापन केले आहे, असा दावा ठाकरे सरकार ने केला आहे. याशिवाय ठाकरे आणि शिंदे गटात शिवेसना कोणाची यावरून देखील वाद सुरू आहे. दोन्ही गटांकडून आपणच शिवसेना असून पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल आहेत, त्यामध्ये सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिसला शिंदे गटाने आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी दिलेले निमंत्रण व बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली संधी याबाबत ठाकर गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधातही शिवसेना (ठाकरे गटाने) याचिका दाखल केली आहे, अशा स्वरुपातील याचिकांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button