Latest

Nashik Swine Flu | धक्कादायक ! नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने घेतला डॉक्टरचा बळी, मृतांचा आकडा सहावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कडक उन्हातही शहर-जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असून, शहरातील जेलरोड भागातील एका वयस्कर डॉक्टरचा या आजाराने बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरातच स्वाईन फ्लू बळींचा आकडा सहावर पोहोचला आहे. मृतांमध्ये पाच ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत शहरात २३, तर ग्रामीण भागात १८ जणांना या आजाराची लागण झाली आहे. (Nashik Swine Flu)

यंदाच्या उन्हाळ्यात वाढते तापमान नवनवे विक्रम गाठत असताना स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव आश्चर्यकारक ठरला आहे. जानेवारी महिन्यात शहरात स्वाईन फ्लूची 'एंट्री' झाली. एप्रिल आणि मे महिन्यात या आजाराची लागण वेगाने होत असल्याचे रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. शहरात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात स्वाईन फ्लूचे २३ बाधित आढळून आले आहेत. जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. गेल्या महिन्यात सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. सद्यस्थितीत शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे. ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण शहरी भागात उपचार घेत असल्याने त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झाली आहे. शहरात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Swine Flu)

अशी आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे (Nashik Swine Flu)

थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आदी या आजाराची लक्षणे आहेत. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या या सारख्या पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. रुग्णांनी मास्क वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नयेत.

शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असून घाबरण्यासारखे काही नाही. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय विभागासोबत संपर्क करावा.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा, नाशिक

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT