Latest

Nashik Rain Update : पावसाचे चार महिने संपले, नाशिक जिल्ह्यात अवघा ६९ टक्के पाऊस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, पावसाळ्याचे चार महिने संपुष्टात आले असताना, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या अवघी ६९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. दिंडोरीत पावसाने सरासरी गाठली. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख लाभलेल्या इगतपुरीत मात्र ५५ टक्के पाऊस झाला. चालू वर्षी मान्सूनची तूट बघता, ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. (Nashik Rain Update)

संबधित बातम्या :

अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी मान्सूनवर चांगलाच परिणाम झाला. राज्याच्या काही भागांत पावसाने तडाखा दिला असताना, उत्तर महाराष्ट्रात त्यातही नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी केली. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ९३४ मिमी इतके आहे. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत मात्र, जिल्ह्यात केवळ ६४३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६९ टक्के इतकेच आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत १२०७ मिमी (१२९ टक्के) जिल्ह्यात पाऊस झाला होता.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी चालू वर्षी 15 ही तालुक्यांत पावसाचा लहरीपणा कायम होता. यंदा दिंडाेरीने वार्षिक सरासरी गाठली असून, तालुक्यात १२० टक्के पाऊस पडला. दिंडोरी वगळता अन्य एकाही तालुक्याने सरासरी पार केली नाही. पावसाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या इगतपुरीत चार महिन्यांत १६७२ मिमी पाऊस झाला आहे. वास्तविक तालुक्याचे प्रमाण हे ३०५८ मिमी असताना, यंदा ५५ टक्केच पावसाची नोंद झाली, तर नांदगावला अवघा ६४ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये १६१४ मिमी पाऊस झाला असून, त्याचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. नाशिकमध्ये ७६ टक्के पावसाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, उत्तर भारतामधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. येत्या काळात जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे सरासरीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

विभागात ७७ टक्के पाऊस

विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर हे पाचही जिल्हे मिळून एकूण वार्षिक पर्जन्यमान ७०७ मिमी इतके आहे. चालू वर्षी पाचही तालुके मिळून गेल्या चार महिन्यांत ५४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७७ मिमी इतके आहे. २०२२ मध्ये या काळात ७८५ मिमी म्हणजे १११ टक्के पाऊस पडला होता.

१ जून ते ३० सप्टेंबर पाऊस (टक्के)

मालेगाव 72.5, बागलाण 75.3, कळवण 98.6, नांदगाव 64.3, सुरगाणा 78.9, नाशिक 75.8, दिंडोरी 120, इगतपुरी 54.7, पेठ 73.4, निफाड 76.1, सिन्नर 70.1, येवला 90.3, चांदवड 72.6, त्र्यंबकेश्वर 74.5, देवळा 72.2.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT