नाशिक | बोधी वृक्षारोपण महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे : छगन भुजबळ | पुढारी

नाशिक | बोधी वृक्षारोपण महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे : छगन भुजबळ

सिडको : पुढारी वृत्तसेवा, नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्धस्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश-विदेशातून उपासक येणार असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सिडकोतील भुजबळ फार्म येथे झालेल्या बोधी वृक्षारोपण महोत्सव नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार ॲड. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, शहर अभियंता एस. आर. वंजारी, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भिक्कू सुगत थेरो, नियोजन समितीचे समन्वयक आनंद सोनवणे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, बोधी वृक्षाच्या फांदी रोपण महोत्सवाचे शहरात महिनाभरासाठी आयोजन करणार असून, या महोत्सवासाठी दलाई लामा तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह थायलंड, कोरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशांतील भन्ते व उपासक उपस्थित राहणार आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्थेवर भर द्यावा. तसेच ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण झाल्यावर त्या फांदीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तेथे पोलिस चौकी कार्यान्वित करावी. या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या जागेचे सपाटीकरण करावे, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा व महानगरपालिका तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या समन्वयाने कार्यक्रमाची नियोजन समिती तयार करावी. तसेच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण होणाऱ्या ठिकाणातील मातीचे तज्ज्ञामार्फत परीक्षण करून घ्यावे, असे निर्देशही भुजबळ यांनी दिले.

साधारण पंचवीसशे वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्याने हे बोधीवृक्ष अतिपूजनीय असून, या बोधी वृक्षाच्या एका फांदीचे रोपण आपल्या नाशिक शहरात होत असल्याने आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व अजून वाढणार आहे. या अनुषंगाने बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहनव्यवस्था, विविध ठिकाणांहून येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन, सुरक्षाव्यवस्था व इतर आनुषंगिक आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याबाबतच्या सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा :

Back to top button