नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलिस अंमलदार प्रशांत नागरे हे जनतेच्या विरोधात कारभार करत आहेत. जनतेला सरंक्षण देण्यासाठी आहे की शोषण करण्यासाठी हा प्रश्न उपस्थित करीत आ. नितेश राणे यांनी देशमुख व नागरे यांनी अवैध मार्गाने संपत्ती जमवल्याचा आरोप हिवाळी अधिवेशनात केल्याने गृहमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांची अपर पोलिस महासंचालकांतर्फे चौकशी करण्याचे आदेश देत नागरे यांची तातडीने बदलीचे आदेश दिले.
आ. राणे यांनी लक्षवेधीमार्फत अंबड पोलिस ठाण्यातील अवैध धंद्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराविषयी आरोप केले. अंबड पोलिस ठाण्याअंतर्गत अवैध धंद्यांना हप्ते घेऊन अभय दिले जात आहे. धर्मांतर, लव्ह जिहादसारख्या घटनांमध्ये फिर्यादींऐवजी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना देशमुख पाठबळ देतात. हप्ते घेऊन भंगार व्यावसायिक, अवैध धंदेचालकांना मदत केली जाते. अंबडच्या हद्दीत वर्षभरात दहा खून झाले असून, अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न आ. राणे यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांकडे बंगले, गाड्या असून हा पैसा आला कोठून, अवैध धंद्यांवर कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित करीत देशमुख यांची एसीबी, सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी आ. राणे यांनी केली.
त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांची अपर पोलिस महासंचालकांमार्फत महिनाभरात चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच पोलिस नाईक प्रशांत नाईक याचा अंबड पोलिस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांची शहरात इतरत्र बदली करण्याचे आदेश दिले.