गोव्यात नववर्षाच्या पार्ट्या रंगणार सकाळी सहापर्यंत? | पुढारी

गोव्यात नववर्षाच्या पार्ट्या रंगणार सकाळी सहापर्यंत?

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने खुल्या जागेत रात्री दहा वाजल्यानंतर मोठ्या आवाजाला बंदी घातली आहे. मात्र, असे असले तरी उत्तर गोव्यातील किनारी भागात नववर्षाच्या पार्ट्या सकाळी सहापर्यंत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक पार्टी आयोजकांनी याबाबत जाहिराती दिल्या आहेत. यामध्ये पार्टीची वेळ 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 1 जानेवारी रोजी सकाळी 6 पर्यंत अशी दिली आहे. त्यामुळे ध्वनीमर्यादेची सक्ती कागदावरच राहाणार की काय, असा सवाल विचारला जात आहे.

न्यायालयाने आवाजाची मर्यादा ही खुल्या जागेसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या नियमात राहून पार्ट्यांचे आयोजन करता यावे, यासाठी आयोजकांनी नवी शक्कल काढली आहे. त्यांनी या पार्ट्या बंदिस्त जागेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आवाज बाहेर जाणार नाही, असा दावा ते करत आहेत. असे असले तरी स्थानिकांना या दाव्याबाबत शंका आहेत.

25 डिसेंबर रोजी नाताळनिमित्त किनारी भागातील हॉटेलमध्ये रंगलेल्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर सलग तीन दिवस अशा पार्ट्या सुरूच आहेत. काही पार्ट्या बंदिस्त जागेत झाल्या; तरी त्यांचा आवाज तीन किलोमीटरपर्यंत येत होता. 31 डिसेंबर रोजी याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

Back to top button