Latest

Nashik News: गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, गोदाघाट पाण्याखाली

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुका व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा गोदाघाट पाण्याखाली गेला आहे. काठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग कायम आहे. (Nashik News)

संबधित बातम्या :

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि. २३) मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. नाशिक शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाशिककरांची रविवारची (दि. २४) पहाट पावसाच्या स्वागताने झाली. दिवसभरात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींच्या हजेरीनंतर सायंकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. त्यातच धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाहही अधिक आहे. त्यामुळे शनिवारी (दि. २४) पहाटे बंद केलेली धरणाचे दारे रात्रीतून उघडण्यात आली. तसेच टप्प्याटप्प्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. रात्री आठच्या सुमारास धरणातून ४ हजार ५४४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. परिणामी, गाेदाघाट पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला. त्यानंतर काठावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी सामानाची आवरासावर सुरू केली. (Nashik News)

ग्रामीण भागातही संततधार सुरू असल्याने दारणा, पालखेड, चणकापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग केला जात आहे. दारणामधून २ हजार ७०८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय पालखेडमधून ८४७ व चणकापूरमधून १७६२ वेगाने क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जातोय. तसेच भावली २०८, वालदेवी २५, कडवा ८२४, आळंदी ८७, करंजवण ३०१, वाघाड २६३, तर हरणबारी व केळझरमधून अनुक्रमे १३४ व ३० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, गोदावरी, दारणा व पालखेड समूहामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वरमध्ये वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचा विसर्ग १० हजार ७०२ करण्यात आला असून, वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावते आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT