हाँगझोऊ : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. दुसरे पदक पुरुष दुहेरी लाईटवेट स्कलमध्ये जिंकले. या दोन पदकांसह भारताने पदकतालिकेतही स्थान मिळवले. पहिली दोन्ही पदके रौप्य मिळाली. त्यानंतरही पदकांचा ओघ सुरुच राहिला. भारताने 3 रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. तर महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे तेथे आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीने भारताचे पदकतालिकेत खाते उघडले. येथे भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले. तिघींनी मिळून 1886 गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने 631.9 गुण मिळवले. मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 गुण मिळवले. नेमबाजीत भारताला आणखी एक पदक मिळालेे. रमिताने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले. नेमबाजीतील भारताचे हे दुसरे पदक आहे.
नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल स्कल्समध्ये आनंद साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 अशा वेळेसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनकडे गेले.
'ब' गटातील सामन्यात भारताला थायलंडकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने एशियन गेम्सच्या राऊंड ऑफ 32 मध्ये दमदार विजय मिळवला. तिने 5 – 0 ने सामना जिंकत पुढची फेरी गाठली.