Latest

Nashik News : ‘ईपीएफओ’च्या लाचखोर आयुक्तासह तिघांची कारागृहात रवानगी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) कार्यालयात एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेणाऱ्या तीन संशयितांची रवानगी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेशान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने पाच दिवासांच्या चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी तपासातील मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यावर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सीबीआयच्या नाशिक विभागीय पथकाने २७ डिसेंबर रोजी ईपीएफओ कार्यालयात सापळा रचून विभागीय आयुक्त संशयित गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा, ईपीएफओ एजंट बी. एस. मंगलकर यांना अटक केली होती. पोलिस निरीक्षक रणजितकुमार पांडे, गजानन देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांच्या घरझडतीत सापडलेल्या मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (दि. १) संशयितांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर संशयितांच्या जामीन अर्जावर पुढील दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

… असा झाला व्यवहार

आडगाव येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाने सीबीआयच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानुसार नाशिक विभागीय पथकाने प्रकरणाची खात्री केली. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी ईपीएफओ कार्यालयाने तक्रारदाराला नोटीस बजावली होती. त्यामध्ये तक्रारदाराच्या कंपनीचे सन २०१९ ते २०२१ या कालावधीतील बँक खात्याची माहिती मागवण्यात आली. यादरम्यान, संशयित आहुजा याने संशयित मंगलकर याच्याकडे पुढील माहिती मिळेल असे सांगितले. दोन दिवसांनी तक्रारदाराने बँक खात्याची माहिती व स्टेटमेंट सादर केले. त्यावेळी साडेदहा लाख रुपयांचे पीएफ व दंड थकीत आहे. त्यासाठी दोन लाख रुपये लाच द्यावी लागेल, असा व्यवहार ठरला. यानंतर वेळोवेळी फोनवरून संभाषण झाल्यावर डिसेंबर महिन्यात संशयितांनी लाच घेतली, असे सीबीआयने फिर्यादीत नमूद केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT